भारताची चांद्रयान-२ ही महत्त्वाकांक्षी मोहीम पुन्हा लांबणीवर पडली असून ती आता जानेवारीपर्यंत तरी होण्याची शक्यता नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) या वर्षी दोन वेळा अपयश आल्यानंतर आता या ऑक्टोबरमध्येही ही मोहीम होण्याची शक्यता नाही. सुरुवातीला चांद्रयान-२ एप्रिलमध्येच पार पाडण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण इस्रोचा जीसॅट ६ ए हा लष्करी संदेशवहन उपग्रह सोडण्यात आला आणि नंतर त्याच्याशी संपर्कच तुटला, त्यामुळे तो वाया गेला. त्यानंतर फ्रेंच गयानातील कोअरू येथून जीसॅट ११ या उपग्रहाचे उड्डाण होणार होते. पण तेही मागे घेण्यात आले. गेल्या सप्टेंबरमध्ये पीएसएलव्ही सी ३९ प्रक्षेपकाच्या मदतीने आयआरएनएसएस १ एच हा उपग्रह सोडण्यात आला. पण उष्णतारोधक आवरण न उघडल्याने तो अपयशी ठरला. इस्रोने त्यानंतर सावध भूमिका घेतली असून दोन अपयशांमुळे चांद्रयान-२ मोहीम लांबणीवर टाकली आहे. चांद्रयान-१ व मंगळयान या मोहिमा यशस्वी केल्यानंतर आता इस्रोची ही तिसरी मोहीम अपेक्षित होती. एका अधिकाऱ्याने सांगितले, की आता आम्ही कोणतीही जोखीम घेणार नाही. चांद्रयान पाठवण्यासाठी काही सुयोग्य कालावधी आहेत. पण पुढील वर्षी जानेवारीपर्यंत तरी चांद्रयान-२ सोडले जाण्याची शक्यता कमी आहे. एप्रिलमध्ये इस्रोचे प्रमुख सिवान यांनी सांगितले होते, की चांद्रयान-२ चे उड्डाण आम्ही ऑक्टोबर व नोव्हेंबपर्यंत लांबणीवर टाकत असल्याचे सरकारला कळवले आहे. मोहिमेच्या राष्ट्रीय समितीने चांद्रयान-२ मोहिमेचा फेरआढावा घेऊन अधिक चाचण्या करण्याची सूचना केली आहे. चांद्रयान-२ मोहीम चांद्रयान-२ मोहिमेत भारत प्रथमच तेथील पृष्ठभागावर रोव्हर गाडी उतरवणार असून ती भारताची दुसरी चांद्रमोहीम आहे. त्याचा खर्च ८०० कोटी रुपये असून यातील रोव्हर गाडी चंद्राच्या आतापर्यंत संशोधन न झालेल्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. अंतराळ स्पर्धेत इस्रायल पुढे जाण्याची शक्यता गेल्या महिन्यात इस्रायलने चंद्रावर यान पाठवण्याची योजना जाहीर केली. सर्व काही योजनेनुसार घडले तर १३ फेब्रुवारी २०१९ रोजी इस्रायलचे यान चंद्रावर उतरेल. अमेरिकी अंतराळ उद्योजक इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीच्या प्रक्षेपकावरून हे यान सोडण्यात येईल. ते चंद्राच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करेल. आजवर अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर याने पाठवली आहेत. चौथे स्थान पटकावण्यासाठी भारत आणि इस्रायलमध्ये स्पर्धा आहे. भारताची मोहीम लांबणीवर गेल्याने या स्पर्धेत इस्रायल बाजी मारण्याची शक्यता आहे.