भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची उपग्रह प्रक्षेपण मोहीम अयशस्वी ठरली आहे. आज पहाटे जीएसएलव्ही- एफ १० या प्रक्षेपकाने ( रॉकेटने ) नियोजित वेळेनुसार ५ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून ईओएस-०३ या कृत्रिम उपग्रहासह अवकाशात झेप घेतली. प्रक्षेपकाचे पहिले दोन टप्पे यशस्वी पार पडले. मोहीम सुरू झाल्यावर साधारण नऊ मिनिटात प्रक्षेपकाने सुमारे १३० किलोमीटर एवढी उंची गाठल्यावर मोहिमेतील महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. उपग्रहाला आणखी उंचीवर नेणारा क्रायजेनिक इंजिनाचा टप्पा सुरू झाला. पण अवघ्या काही सेकंदातच या इंजिनासह उपग्रह नियोजित मार्ग भरकटत असल्याचे लक्षात आले.

या सर्व उपग्रह मोहिमेचे थेट प्रक्षेपण इस्रोच्या संकेतस्थळावरून आणि इस्रोच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होते. श्रीहरिकोटा इथल्या मिशन कंट्रोलमधून प्रत्येक सेकंदाबाबत होणाऱ्या घडामोडीची माहिती सांगितली जात होती. मात्र मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात गडबड झाल्याचे लक्षात आल्यावर मिशन कंट्रोलमधील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंते यांचे चेहरे चिंतातुर झाले. त्यानंतर दहा मिनिटात या मोहिमेचा आढावा घेत इस्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी मोहीम पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट केले.

आजचे प्रक्षेपक – रॉकेट जीएसएलव्ही- एफ १० हे जीएसएलव्ही- एमके २ या प्रकारातील होते. २५०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह भुस्थिर कक्षेत नेण्याची क्षमता असलेले, क्रायजेनिक इंजिनाचा समावेश असलेले जीएसएलव्ही- एमके २ हे एक इस्रोचे महत्त्वाचे प्रक्षेपक – रॉकेट आहे. आजचे जीएसएलव्ही- एमके २ चे एकूण १४ वे उड्डाण होते. २००१ पासून सुरू झालेल्या जीएसएलव्ही- एमके २ च्या प्रक्षेपणात सुरुवातीला एकूण पाच मोहिमांमध्ये अपयशाचा सामना इस्रोला करावा लागला होता. त्यामुळे इस्रोच्या या प्रक्षेपकाला, जीएसएलव्ही- एमके २ ला, नॉटी बॉय म्हणूनही ओळखले जात होते. मात्र गेल्या सहा सलग मोहिमा या यशस्वी झाल्याने, इस्रोचा हा नॉटी बॉय पुन्हा सरळ वागू लागल्याने, इस्रोमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण होते.

आजच्या मोहिमेत क्रायजेनिक इंजिनाच्या टप्प्यावर, तिसऱ्या टप्प्यावर तांत्रिक बिघाड झाल्याचे प्राथमिकरित्या दिसून येत आहे. हा इस्रोसाठी मोठा धक्का आहे. कारण अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात क्रायजेनिक इंजिन हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. अमेरीका, रशिया, फ्रान्स, जपान, चीन या देशानंतर फक्त भारताकडे हे तंत्रज्ञान आहे. क्रायजेनिक इंजिनाच्या तंत्रज्ञावर प्रभुत्व मिळवल्याने इस्रोने जास्त वजनाच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या मोहिमा आखायला सुरुवात केली होती.

याआधी हीच मोहीम तांत्रिक कारणांनी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. आता तिसऱ्या प्रयत्नात मोहीम अयशस्वी झाली आहे. तेव्हा आजच्या अपयशाचा आगामी मोहिमांवर विशेषतः भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात नेणाऱ्या ‘गगनयान’ मोहिमेवर परिणाम होतो का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मागील काही काळामधील हा इस्त्रोचा तिसरा प्रयत्न अपयशी ठरलाय. यापूर्वी ५ मार्च २०२० रोजी या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार होते. मात्र प्रक्षेपणाच्या २६ तास आधीच ते रद्द करण्यात आलं. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला या उपग्रहाचे प्रक्षेपण अपेक्षित होतं पण व्होल्टेजसंदर्भातील अडचणीमुळे हा प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं. इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी त्यावेळी छोट्या अडचणीमुळे प्रक्षेपण पुढे ढकलत असल्याचं म्हटलं होतं.

या उपग्रहामुळे भारतीय उपखंडातील विविध भागाची २४ तास सुस्पष्ट छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे. पीक लागवडीच्या क्षेत्राबद्दल माहिती घेणे, दुष्काळ-पूर परिस्थीतीवर लक्ष ठेवणे, सागरी क्षेत्र व्यवस्थापन, वातावरणातील धुकं-धुळ याबद्दलची ताजी माहिती, आपातकालीन व्यवस्थापन अशा विविध गोष्टींसाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.