चंद्रावर दुसऱ्यांदा पाऊल ठेवण्यासाठी भारत आता सज्ज झाला आहे. कारण, भारताची महत्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-२ सुरु होण्याबाबतची प्रतीक्षा आता संपली आहे. पुढील महिन्यांत १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी हे यान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. भारतीय अंततराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी आज (दि.१२) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली, तसेच या मोहिमेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. तसेच या मोहिमेची माहिती देणाऱ्या एका वेबसाईटचे उद्घाटनही यावेळी डॉ. सिवन यांच्या हस्ते करण्यात आले.

चांद्रयानाच्या तांत्रीक बाबींची माहिती

चांद्रयान-२ हे १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी प्रक्षेपित केले जाईल. याचे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. रोव्हर हे एक रोबोटिक यंत्र असून त्याचे वजन २७ किलो असून लांबी १ मीटर आहे. लँडरचे वजन १.४ टन आणि लांबी  ३.५ मीटर आहे. तर ऑर्बिटरचे वजन २.४ टन आणि लांबी २.५ मीटर इतकी आहे.

यान चंद्रावर प्रत्यक्षात कसे उतरेल

लँडरला ऑर्बिटरच्यावरती ठेवण्यात येईल. लँडर, ऑर्बिटर आणि रोव्हरला एकत्रितपणे कंपोझिट बॉडी असे संबोधण्यात आले आहे. या कंपोझिट बॉडीला GSLV MK lll लॉन्च व्हेईकलमध्ये गरम आवरणामध्ये ठेवण्यात येईल. १५ जुलैला यानाचे प्रत्यक्ष प्रक्षेपण झाल्यानंतर GSLV MK lll मधून कपोझिट बॉडीला बाहेर ढकलले जाईल. त्यानंतर कंपोझिट बॉडीच्या खालच्या भागातून इंधनाचे ज्वलन सुरु झाल्यानंतर ही बॉडी चंद्राच्या दिशेने झेपावेल. त्यानंतर काही दिवसांनी ती चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. त्यानंतर योग्य वेळी लँडर ऑर्बिटरपासून वेगळा होईल, त्यानंतर लँडर चंद्रापासून ३० किमी अंतरावरील कक्षेत ४ दिवस फिरत राहिल. प्रत्यक्ष चंद्रावर लँडिगच्या दिवशी लँडरची प्रोपल्शन सिस्टिम त्याचा वेग कमी करेल आणि लँडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवेल. या प्रक्रियेसाठी सुमारे १५ मिनिटांचा वेळ लागेल.