ISRO Bluebird Block-2 Satellite : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज (२४ डिसेंबर) एका ‘बाहुबली’ उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. एलव्हीएम ३-एम ६ (LVM3-M6) या रॉकेटच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात शक्तीशाली उपग्रह लाँच करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जगातील सर्वात वजनदार आणि शक्तीशाली ब्लूबर्ड ब्लॉक-२ (Bluebird Block-2) या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्यामुळे इस्रोसाठी एक मोठं यश मानलं जात आहे.
इस्रोने आज सकाळी ८.५५ वाजता ब्लूबर्ड ब्लॉक-२ या अमेरिकन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या ब्लूबर्ड ब्लॉक-२ चं वजन ६,१०० किलोग्रॅम असून हा उपग्रह भारताने प्रक्षेपण केलेला आतापर्यंतचा सर्वात वजनदार आणि शक्तीशाली उपग्रह असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
इस्रोने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ब्लूबर्ड ब्लॉक २ हा उपग्रह ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीसाठी डिझाइन करण्यात आलेला आहे. या माध्यमातून पृथ्वीवर ४ जी, ५ जी, व्हिडीओ कॉल, मेसेजिंगसह स्ट्रीमिंग सेवा आणखी सक्षम करण्यास मदत होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी काय प्रतिक्रिया दिली?
इस्रोने ब्लूबर्ड ब्लॉक प्रक्षेपित केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत म्हटलं की, “भारताच्या अंतराळ क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतीय भूमीवरून प्रक्षेपित केलेला सर्वात वजनदार उपग्रह, LVM3-M6 चं यशस्वी प्रक्षेपण, ब्लूबर्ड ब्लॉक-२ हा उपग्रह नियुक्त कक्षेत स्थापित केला, हा भारताच्या अंतराळाच्या प्रवासातील एक अभिमानाचा टप्पा आहे. हे भारताची क्षमता आणखी मजबूत करतं आणि जागतिक पातळीवर आपली वाढती भूमिका मजबूत करतं. हे स्वावलंबी भारताच्या दिशेने आमच्या प्रयत्नांचं एक प्रतीक देखील आहे. आमच्या इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचं अभिनंदन. भारत आणखी उंची गाठत राहील”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

