भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने नवा इतिहास रचला आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून पहिलं खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस कंपनीचं आहे. या रॉकेटचं नाव विक्रम सबऑर्बिटल असं आहे. निर्धारित लक्ष्यानुसार, हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे.

या रॉकेटने सकाळी ११.३० वाजता सतीश भवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी झेप घेतली. या रॉकेटला दिलेलं विक्रम एस हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून दिलं आहे.

हैदराबादमधील स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने २०२० मध्ये या रॉकेटच्या निर्मितीला सुरुवात केली होती. ही कंपनी स्टार्ट अप योजनेंतर्गत सुरू झाली होती. या कंपनीला इस्रो आणि इन स्पेस या केंद्रानेही मदत केली. या रॉकेटने दोन भारतीय आणि एक आंतरराष्ट्रीय ग्राहकाचे पेलोड्स घेऊन यशस्वी प्रक्षेपण केलं.

रॉकेट १०० किमी प्रवास केल्यावर समुद्रात का कोसळणार?

या रॉकेटची निर्मितीच जास्तीत जास्त १०१ किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी करण्यात आली आहे. त्यामुळेच शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) प्रक्षेपण झालेलं हे रॉकेट १०० किमी अंतर पार करून समुद्रात कोसळेल. या रॉकेटचं वजन ५४५ किलो इतकं आहे.