पीटीआय, श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी देशातील पहिला ‘इमेजिंग’ उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडून इतिहासात आपले नाव पुन्हा एकदा सुवर्णाक्षरात कोरले आहे. ‘इस्रो’ने ‘जीएसएलव्ही’ रॉकेटच्या सहाय्याने २३०० किलो वजनाचा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडून त्याला भू-समकालिक (जिओसिंक्रोनस) कक्षेत स्थिर केले. या वर्षातील ‘इस्रो’चे हे पहिले यश आहे.

या उड्डाणाची उलटगणती २७ तासांपासून सुरू झाली. सतीश धवन अवकाश केंद्रातून पहाटे २.५५ वाजता रॉकेटने उपग्रहासह उड्डाण केले. ‘जीएसएलव्ही’ रॉकेट तीन टप्प्याचे असून, ५१.७ मीटर लांबीचे आहे. यातील तिसरा टप्पा क्रायोजेनिक स्वरुपाचा आहे. उपग्रह रॉकेटच्या वरच्या बाजूला लावला होता. या मोहिमेचे संचालक थॉमस कुरिअन आणि प्रकल्प संचालक इम्तियाज अहमद होते.

‘इस्रो’चे प्रमुख व्ही नारायणन यांनी सांगितले, ‘जीएसएलव्ही’ची ही १९वी मोहीम आहे. ‘जीएसएलव्ही’मधून १५३६ किलो वजनाच्या उपग्रहाचे पहिले उड्डाण झाले होते. आज सर्वाधिक २३६७ किलो वजनाचा उपग्रह आपण सोडला. या कक्षेत उपग्रह कार्यान्वित झाल्यानंतर तो भारताचा ‘जिओ-ऑर्बिट’ कक्षेतील पहिलावहिला ‘इमेजिंग उपग्रह’ ठरेल.

उड्डाणाची वैशिष्ट्ये

  • ‘जीएसएलव्ही’ रॉकेटमधून नेण्यात आलेला ‘ईओएस-५’ उपग्रह आतापर्यंत रॉकेटने नेलेल्या उपग्रहांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे २३०० किलो वजनाचा.
  • ‘ईओएस-०५’ उपग्रहाला अवकाशात सोडल्यानंतर १८ मिनिटांनी ‘सब-जिओसिंक्रोनस ट्रान्स्फर’ कक्षेत यशस्वीपणे सोडण्यात आले.
  • अनेक पृथ्वी निरीक्षण उपग्रह कमी उंचावरील भूस्थिर कक्षेत राहून काम करतात. मात्र, ईओएस-५ उपग्रह अधिक उंचीवरून, सुमारे ३६ हजार किलोमीटर उंचीवरील ‘जिओसिंक्रोनस’ कक्षेतून काम करील. पृथ्वीच्या फिरण्याचा आणि उपग्रहाचा वेग सारखा असेल.
  • यापूर्वीच्या काही मोहिमांमध्ये आलेल्या अपयशानंतर आलेल्या या यशामुळे शास्त्रज्ञांना आनंद.
  • हा उपग्रह म्हणजे ‘आकाशातील भारताचा डोळा’ असल्याचे वर्णन एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने केले. या उपग्रहामुळे एखाद्या ठिकाणची प्रत्यक्ष स्थितीतील छायाचित्रे आपल्याला मिळणार असून, त्यामुळे शेती, संकट व्यवस्थापनाच्या क्षेत्रात मदत होणार आहे.

हे इस्रोचे आणखी एक यश आणि देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारताचा पहिल्या भू-समकालिक इमेजिंग ‘ईओएस-०५’ उपग्रहाचे वहन करणार्‍या ‘जीएसएलव्ही-एफ१६’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण हे उत्कृष्टपणा, नवनिर्मिती आणि अवकाश क्षेत्रातील भारताची वाढती क्षमता दर्शवते. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गेल्या काही वर्षांमध्ये ‘इस्रो’च्या मोहिमांकडे सर्वसामान्यांचेही लक्ष असते. शुक्रवारी ‘जीएसएलव्ही-एफ१७’ रॉकेटचे प्रक्षेपण दुर्बिणीतून पाहण्याचा आनंद लुटणारी मुलगी.