पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ७२ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना ‘मिशन गगनयान’ची महत्वपूर्ण घोषणा केली. मोदींच्या या घोषणेला भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. २०२२ साली ‘गगनयान’ मधून भारताचा मुलगा किंवा मुलगी अवकाशात पोहोचेल. त्याच्या किंवा तिच्या हाती आपला तिरंगा ध्वज असेल असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला जो शब्द दिलाय तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. २०२२ पर्यंत भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी अवकाश संस्था पूर्णपणे सक्षम आहे असे इस्त्रोचे अध्यक्ष आणि वैज्ञानिक के.शिवन यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला २०२२ पर्यंतचे लक्ष्य दिले आहे. ठरवून दिलेल्या वेळेत लक्ष्य पूर्ण करणे आमचे कर्तव्य आहे.

आम्ही आधीपासूनच या मोहिमेची तयारी करत आहोत. क्रू मॉडयुल आणि अन्य तांत्रिक बाबींचे काम पूर्ण केले आहे. आता आम्हाला प्राथमिकता निश्चित करुन लक्ष्य गाठावे लागेल असे इस्त्रोचे अध्यक्ष के.शिवन यांनी सांगितले. या मोहिमेसाठी मोठे रॉकेट आणि अंतराळवीराचे प्रशिक्षण ही दोन मुख्य आव्हाने इस्त्रोसमोर आहेत. २०२२ ची मुदत कठिण असली तरी आमच्यामध्ये मोहिम यशस्वी करण्याची क्षमता आहे असे वैज्ञानिक तुषार जाधव यांनी सांगितले.

२०२२ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होतील. तेव्हा भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल. भारतीय वैज्ञानिक यादृष्टीने पावले टाकत आहेत. इस्त्रोमध्येही यादृष्टीने वेगाने काम सुरू आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. आत्तापर्यंत रशिया, चीन आणि अमेरिका या तीन देशांनीच अंतराळात माणूस पाठवला आहे पण या यादीत आता भारताचेही नाव जोडले जाईल. इस्त्रोने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अंतराळ मोहिमा हाती घेतल्या आहे.अनेक उपग्रहही अंतराळात पाठवले आहेत. लवकरच भारत अंतराळात माणूस पाठवेल यात मला काहीही शंका वाटत नाही असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.