scorecardresearch

‘इस्रो’च्या लघु उपग्रह मोहिमेत ‘विदा’ गमावल्याने अडथळा

सतीश धवन अवकाश केंद्राच्या संगणक पटलांवर भू निरीक्षण उपग्रह व दुसरा ‘आझादीसॅट’ उपग्रह नियोजनानुसार रॉकेटपासून अवकाशात विलग होताना दिसले.

‘इस्रो’च्या लघु उपग्रह मोहिमेत ‘विदा’ गमावल्याने अडथळा
(एसएसएलव्ही) मोहिमेत ‘टर्मिनल’ टप्प्यात विदा गमावण्याचा (डेटा लॉस) अडथळा निर्माण झाला.

पीटीआय, श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)

भारतीय अवकाश संशोधन संघटनेतर्फे (इस्रो) रविवारी महत्त्वाकांक्षी लघु उपग्रह प्रक्षेपण यान (एसएसएलव्ही) मोहिमेत ‘टर्मिनल’ टप्प्यात विदा गमावण्याचा (डेटा लॉस) अडथळा निर्माण झाला. या मोहिमेतील तीन टप्पे अपेक्षेनुसार सुरळीत पार पडले. मात्र ‘टर्मिनल’ टप्प्यात ‘डेटा लॉस’ झाल्यामागची कारणे शोधण्यात येत आहेत. अवकाशात एक भूनिरीक्षण उपग्रह आणि विद्यार्थ्यांनी विकसित केलेला उपग्रह पाठवण्यासाठी एसएसएलव्ही-डी१/ईओएस-०२ ने ढगाळ हवामानातही सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी नऊ वाजून १८ मिनिटांनी उड्डाण केले. सुमारे साडेसात तास उलट गणनेनंतर ३४ मीटर लांब ‘रॉकेट’ने अवकाशात झेप घेतली. त्यानंतर या ‘रॉकेट’च्या स्थितीविषयी या मोहिमेच्या नियंत्रण केंद्राला शास्त्रज्ञांकडून माहिती देण्यात आली. ‘इस्रो’च्या प्रसारमाध्यम केंद्रांच्या उपलब्ध पडद्यांवर उपग्रह आपल्या सुनिश्चित मार्गाने जाताना दिसला. त्यानंतर मात्र ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ‘डेटा लॉस’ची माहिती दिली.

सोमनाथ यांनी श्रीहरिकोटा येथे उपग्रह प्रक्षेपणानंतर काही मिनिटांनी मोहीम नियंत्रण केंद्रास सांगितले, की या मोहिमेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांत अपेक्षेनुसार कामगिरी झाली. परंतु ‘टर्मिनल’ टप्प्यांत काही प्रमाणात विदा गमावला (डेटा लॉस) आहे. या आकडेवारीचे विश्लेषण आम्ही करत आहोत. या प्रक्षेपण रॉकेटच्या कामगिरीसह अवकाशात सोडण्यात आलेल्या उपग्रहांची माहिती आम्ही लवकरच देऊ. सोमनाथ यांनी मोहीम नियंत्रण केंद्रात माहिती देण्याआधी, शास्त्रज्ञांचा उत्साह मावळला होता. आपापल्या संगणकाच्या पडद्याकडे पाहणारे ते गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होते. अद्याप या मोहिमेच्या यशाविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. ‘रॉकेट’च्या आकडेवारीचे विश्लेषण सुरू आहे. सतीश धवन अवकाश केंद्राच्या संगणक पटलांवर भू निरीक्षण उपग्रह व दुसरा ‘आझादीसॅट’ उपग्रह नियोजनानुसार रॉकेटपासून अवकाशात विलग होताना दिसले.

मोहिमेचा उद्देश : ‘इस्रो’ने आपल्या भरवशाच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (जीएसएलव्ही) यांच्या यशस्वी मोहिमेनंतर लघु उपग्रह प्रक्षेपण यान (एसएसएलव्ही) क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. त्याचा उपयोग पृथ्वीच्या निम्न कक्षेत उपग्रह सोडण्यासाठी केला जाईल. ‘इस्रो’ने ‘इन्फ्रा रेड बँड’मध्ये ‘ऑप्टिकल रिमोट सेंन्सिंग’ मिळवण्यासाठी भू निरीक्षण उपग्रह निर्मिती केली असून, तो ‘ईओएस-०२’ लघु उपग्रह श्रृंखलेतील उपग्रह आहे. ‘स्पेस किड्स इंडिया’अंतर्गत ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘आझादीसॅट’ या दुसऱ्या उपग्रहात ७५ विविध उपकरणे आहेत. त्याचे ५० ग्रॅम वजन आहे. या उपग्रहाकडून माहिती प्राप्त करण्यासाठी जमिनीवरील प्रणालींचा वापर केला जाईल. हे दोन्ही उपग्रह आज प्रक्षेपित करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Isro s sslv suffers data loss at terminal stage zws

ताज्या बातम्या