ISRO scientists Resignation : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील म्हणजेच इस्रोमधील अनेक शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या काही महिन्यांत किमान १०० शास्त्रज्ञांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने हस्तक्षेप करत स्वेच्छानिवृत्ती आणि नोकरी सोडण्याच्या नियमांमध्ये कडक बदल केले आहेत. विशेषतः गगनयानसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मोहिमांवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारचे थेट आदेश

१४ जुलै जारी करण्यात आलेले पत्रक इंडिया टुडेच्या हाती लागले आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने इस्त्रोच्या सर्व केंद्रांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. गगनयान आणि इतर महत्त्वाच्या मोहिमांशी संबंधित असलेल्या ‘ग्रुप ए’ मधील वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे राजीनामे किंवा स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज स्वीकारू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. या परिपत्रकानुसार, आता राजीनामा किंवा निवृत्तीशी संबंधित सर्व अर्ज पुढील निर्णयासाठी थेट अंतराळ विभागाकडे पाठवले जातील.

सामूहिक राजीनाम्यांमागील कारणे आणि आकडेवारी

माध्यमांतील वृत्तानुसार, सुमारे १०० शास्त्रज्ञांनी राजीनामे सादर केल्यामुळे केंद्र सरकारला हे पाऊल उचलावं लागलं आहे. अंतराळ विभागाने अधिकृतपणे ही संख्या जाहीर केलेली नसली, तरी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने इस्त्रोमधील विविध सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत १०० ते १२० शास्त्रज्ञांनी राजीनामे दिले असण्याची शक्यता आहे. यामध्ये बंगळुरू (कर्नाटक) येथील ‘यू. आर. राव सॅटेलाइट सेंटरमधून तब्बल ८० शास्त्रज्ञांनी, तर तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधून सुमारे २० शास्त्रज्ञांनी नोकरी सोडली आहे.

इस्त्रो प्रमुखांची प्रतिक्रिया

या सामूहिक राजीनाम्यांची दखल घेत, इस्त्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी सांगितलं की, संस्था या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. अनेक लोक नोकरी सोडून जातात, पण ते प्रत्येक संस्थेत घडत असतं. केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयाचा (परिपत्रकाचा) उद्देश केवळ लोकांना थांबवणं हा नसून, अचानक कोणाच्या जाण्याने महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम रखडू नये हा आहे. तरीही जर कोणी नोकरी सोडून जात असेल, तर त्यांच्या जागेवर दुसरी व्यक्ती ती जबाबदारी सांभाळेल. आम्ही या परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेवत आहोत.”