पीटीआय, मंगळुरू : कर्नाटकात मंगळुरू येथील विद्यापीठाच्या एका महाविद्यालयात काही मुस्लीम विद्यार्थिनी हिजाब घालून वर्गात बसत असल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांच्या एका गटाने गुरुवारी विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. यामुळे राज्यात हिजाबचा मुद्दा पुन्हा उफाळून आला. ४४ विद्यार्थिनी महाविद्यालयात हिजाब घालत असून त्यांच्यापैकी काही जणी वर्गातही तसे करत आहेत, असा दावा महाविद्यालयाच्या गणवेशात आलेल्या निदर्शक विद्यार्थ्यांनी केला.

‘एका शक्तिशाली स्थानिक राजकीय नेत्याच्या दबावामुळे’ महाविद्यालयाचे प्राचार्य व अधिकारी आतापर्यंत या मुद्दय़ावर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहेत आणि विद्यार्थी संघटनेच्या नेत्याचेही त्यांच्याशी संगनमत आहे, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. ‘उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करत आहोत. त्यासाठी महाविद्यालय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करूनही त्यांनी अशी अंमलबजावणी केलेली नाही. न्यायालयाचा आदेश पाळला जावा असा आग्रह पालक- शिक्षकांच्या बैठकीत पालक प्रतिनिधींनी धरला. नंतर मात्र या मुद्दय़ावर सिंडिकेटच्या बैठकीत निर्णय घेतला जावा, असे ते म्हणाले,’ असे आंदोलक विद्यार्थ्यांने सांगितले.