भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन व उप परराष्ट्रमंत्री वेंडी शेरमन यांच्याशी त्यांनी चर्चा केली असून अफगाणिस्तानात तालिबानने ताबा घेतल्यानंतरची परिस्थिती व इतर मुद्द्यांचा त्यात  समावेश होता. ३१ ऑगस्टला अमेरिकेने अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार घेतल्यानंतर दोन्ही देशात प्रथमच उच्चस्तरीय चर्चा झाली.

शृंगला हे बुधवारी न्यूयॉर्कला आले असून  त्यांनी ब्लिंकन यांची भेट गुरूवारी घेतली होती. फॉग बॉटम या परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालायात या नेत्यांची चर्चा झाली. द्विपक्षीय संबंधांबरोबरच अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. शृंगला यांनी सांगितले, की अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन व त्यांच्या खात्यातील उपमंत्री शेरमन यांच्याशी चर्चा झाली.

भारताचे राजदूत तरणजितसिंग संधू यांनी म्हटले आहे, की सकाळी ब्लिंकन व शेरमन यांच्याशी सौहार्दाच्या वातावरणात चर्चा झाली. संरक्षण, सुरक्षा, व्यापार व गुंतवणूक, आरोग्य सेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा या विषयांवरही चर्चा झाली आहे.

शृंगला व शेरमन यांनी अफगाणिस्तानातील समन्वयाची उपाययोजना, भारत- प्रशांत सहकार्यात क्वाडची भूमिका, दोन अधिक दोन पातळीवरील चर्चा  या विषयांचा यात समावेश होता असे सांगण्यात आले. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले, की दोन्ही देशांनी भारत व अमेरिका यांच्यातील भागीदारी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. शृंगला यांनी मानवी, हक्क व लोकशाही तसेच मानवी हक्क याबाबतच्या परराष्ट्र उप मंत्री उजरा झेया यांच्याशी चर्चा केली.

ड्रोन हल्ल्याचे अमेरिकेकडून समर्थन

काबूल : अमेरिकेने अफगाणिस्तानात केलेल्या ड्रोन हल्ल्यात दहा जण ठार झाले. त्यात सहा मुलांचा समावेश होता.   अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले, की ड्रोन हल्ले इस्लामिक स्टेटवर करण्यात आले होते, त्यामुळे त्यांची शक्ती कमी करण्यात यश आले. लष्कराचे जनरल माईक मिली यांनी सांगितले,की ड्रोन हल्ल्यात जे मारले गेले ते आयसिसचे मदतनीस होते. व्हाइट  हाऊसचे प्रसिद्धी  सचिव  जेन साकी यांनी म्हटले आहे, की गुरुवारच्या  हल्ल्यात नागरिक मारले गेले हे आम्हाला मान्य आहे. सुरुवातीला अमेरिकी अधिकाऱ्यांनी असा दावा केला होता, की या हल्ल्यानंतर काही स्फोट झाले त्यात एका वाहनाचे मोठे नुकसान झाले.