Woman Auto Driver Viral Video Instagram: ॲमेझॉन कंपनीत काम करणाऱ्या बंगळुरूमधील एका महिलेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. महिला रिक्षाचालकाबरोबर केलेल्या प्रवासाचा आणि संवादाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर त्यावर लिहिलेल्या कॅप्शनकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. महिलांचे स्वातंत्र्य, त्यांना आवडणारे आणि त्यांनी निवडलेले काम, याबाबत आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

श्रेयांशी सिन्हा या बंगळुरू येथील कार्यालयात काम करतात. नेहमीप्रमाणे कार्यालयात जात असताना प्रवासादरम्यान त्यांनी महिला ऑटो चालकाशी सहज संवाद साधला. श्रेयांशी यांनी सांगितल्याप्रमाणे, महिला ऑटो चालक तिला घ्यायला आल्या. तिचा फोन बंद असल्यामुळे त्यांनी श्रेयांशी यांच्या फोनवर मॅप लावण्यास सांगितला. यानंतर पुढे त्यांच्या संवाद होत गेला. तू ऑटो चालविण्याचा निर्णय का घेतलास? असे विचारत श्रेयांशी यांनी विचारपूस केली.

ऑटो रिक्षा चालक महिलेने याचे प्रामाणिक पण प्रेरणादायी असे उत्तर दिले. श्रेयांशी यांच्या प्रश्नावर चालक महिला हसली आणि म्हणाली, “भांडी घासण्यापेक्षा ऑटो चालवणे जास्त चांगले आहे. कारण मला फिरायलाही आवडते आणि इथे वेळेचे बंधन नाही. मी हवा तितका वेळ आणि वेळ मिळेल तेव्हा ऑटो चालवू शकते. तसेच शहरात कुठेही जाऊ शकते.”

श्रेयांशी पुढे म्हणाल्या, ज्या महिला त्यांना स्वातंत्र्य आणि मोकळीक देणारे काम निवडतात. त्यांचे मला मनापासून कौतुक वाटते.

व्हिडीओ पाहा:

या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर चांगला प्रतिसाद मिळाला असून सहा दिवसात तीन दशलक्षपेक्षाही अधिक लोकांनी व्हिडीओ पाहिला. तसेच लाखो लोकांनी व्हिडीओ लाईक केला असून त्यावर कमेंटही केल्या आहेत. महिला ऑटो चालकाचा आत्मविश्वास आणि तिचा कामाकडे बघण्याचा मुक्त दृष्टीकोन याची अनेकजण प्रशंसा करत आहेत.

कमेंटमध्ये अनेकांनी या महिलेचे बोलणे प्रेरणादायी असल्याचे म्हटले. एका युजरने लिहिले, आज सोशल मीडियावर पाहिलेल्या गोष्टींपैकी सर्वात प्रेरणादायी अशी ही गोष्ट आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, प्रश्न स्वातंत्र्य आणि मोकळीकीचा नाही. तर तिला जे आवडते ते काम तिने करायला घेतले.

तर बंगळुरू सारख्या मेट्रो शहरात महिलेला ऑटो चालवताना पाहून आनंद वाटला, असे काही लोकांनी म्हटले आहे. “आठवड्याभरापूर्वी मीही एका महिला ऑटो चालकाला रिक्षा चालविताना पाहिले. जेव्हा मी एखादी रिक्षा चालक पाहतो, तेव्हा मला खूप सुरक्षित वाटते.”

आणखी एका युजरने म्हटले की, सदर महिला कोणत्याही कामाचा अनादर करत नाही, तर तिच्या आयुष्याला जे काम अनुकूल वाटत आहे, त्याबद्दल ती बोलत आहे. मला वाटते, अशा लोकांची प्रशंसा करून सकारात्मक विचार केला पाहिजे. त्यांना भांडी घासण्यापेक्षा ऑटो चालवणे चांगले वाटत असेल तर त्यांनी कोणत्याही कामाचा अपमान केलेला नाही. तर त्यांनी त्यांना स्वातंत्र्य देणारे काम निवडले आहे.