राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांसह काँग्रेस थेट सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट घेण्यासाठी मोर्चा काढणार आहे. मात्र, एकीकडे मोर्चासाठी विरोधक सज्ज होत असतानाच दुसरीकडे सरन्यायाधीशांनी यासंदर्भात विरोधकांना भेटण्यासाठी नकार दिला आहे. एका इमेलमध्ये सरन्यायाधीशांनी भेटीसाठी नकार देण्याची कारणं कळवल्याचं एएनआयनं म्हटलं आहे. याच प्रकरणावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आहेत संजय राऊत?
इंडिया आघाडीचा मोर्चा सर्वोच्च न्यायालयावर जाणार आहे. राहुल गांधी सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट मागितली होती. आज संध्याकाळी ४ ते ५ च्या दरम्यान ते भेटणार असं ठरलं होतं. पण राजकीय नेत्यांना भेटण्याचा आपल्याला अधिकार नाही अशा प्रकारची भूमिका जेव्हा देशातल्या नागरिकांना धक्का बसला आहे. प्रत्येक संविधानिक संस्थेवर मोदी आणि अमित शाह यांनी त्यांची माणसं बसवलं आहे. यामुळे शेवटचा उपाय म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांना भेटणार असतो तेव्हा तेदेखील चर्चेचा दरवाजा बंद करत आहेत. हे या देशाचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सरन्यायाधीश अवहेलना करणार असतील तर देशाच्या जनतेने काय करायचं?-राऊत
संजय राऊत पुढे म्हणाले, मुख्य न्यायाधीश म्हणतात की मला राजकीय नेत्यांना भेटण्याचा अधिकार नाही. सद्यस्थितीत या विधानावर या देशाची जनता यावर विश्वास ठेवणार नाही. कारण ८० हून अधिक न्यायालयाचंचे न्यायाधीश लंडनला गेले होते, राजकीय नेत्यांसह बॅडमिंटन खेळतानाची छायाचित्रं आम्ही पाहिली आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक तर देशाचे मुख्य न्यायाधीशच आहेत. मुख्य न्यायाधीशांनी राहुल गांधी आणि त्यांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारणं दुर्दैवी गोष्ट आहे. सरन्यायाधीश अशा प्रकारे अवहेलना करणार असतील तर देशाच्या जनतेने जायचं कुणाकडे? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
आंदोलन आणखी तीव्र होईल-राऊत
पश्चिम बंगालमध्ये २९ लाख मतदारांच्या याचिका प्रलंबित आहेत, त्यासंदर्भात कोर्ट ऐकायला तयार नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात हे सांगण्यासाठी जात आहोत की आता तरी जागे व्हा, कारण देश आणि लोकशाही नष्ट होते आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने चर्चेचा दरवाजा बंद केला आहे. आता आंदोलन हे अधिक तीव्र होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे स्ट्रॅटेजी ठरवत आहेत. ते सांगतील ती आंदोलनाची दिशा असेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
