राजस्थानातला सत्तासंघर्ष आता कोर्टात पोहचला आहे. या सगळ्या प्रकरणावर आता राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थानातल्या काँग्रेसमध्ये झालेलं बंड जनतेसाठी दुर्दैवी आहे. काँग्रेस त्यांच्या घरातल्या भांडणाचा दोष भाजपाच्या माथी मारु पाहतंय हे असले प्रकार करणं त्यांनी सोडावं. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाची किंमत राजस्थानच्या जनतेला मोजावी लागते आहे ही बाब दुर्दैवी आहे असंही वसुंधरा राजे यांनी म्हटलं आहे.

राजस्थानमध्ये सत्तासंघर्षाचा एक अंक मागील काही दिवसांमध्ये पाहण्यास मिळाला. उपमुख्यमंत्रीपदी असलेल्या सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा उगारला. त्यामुळे अशोक गेहलोत सरकार अडचणीत आलं. आपल्याकडे २५ आमदारांचा पाठिंबा आहे असं सचिन पायलट यांनी सांगितलं तसंच गेहलोत सरकारकडे बहुमत नाही असाही दावा त्यांनी केला. दरम्यान या सगळ्यामुळे काँग्रेसने राजस्थान प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरुन आणि उपमुख्यमंत्रीपदावरुन सचिन पायलट यांची हकालपट्टी केली. काँग्रेसमधला हा वाद आता न्यायालयात पोहचला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ही सगळी फोडाफोडी भाजपाने केल्याचा आरोप केला आहे. या सगळ्याबाबत आता राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मौन सोडलं आहे.

आणखी वाचा- राजस्थानात ‘ऑपरेशन डेझर्ट’ स्थगित? भाजपाची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका

दरम्यान १६ जुलैलाच राजस्थानातलं गेहलोत सरकार वाचवण्याचा प्रयत्न वसुंधरा राजे करत आहेत असा दावा भाजपाच्या एका मित्रपक्षाने केला होता. आरएलपीचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी केला आहे. बेनीवाल यांनी दोन ट्विट करून हा दावा केला.

आणखी वाचा- मागच्या दीड वर्षापासून आम्ही बोलत नव्हतो, पण पायलट परत आले तर त्यांना मिठी मारेन – अशोक गेहलोत

सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानातील काँग्रेस सरकार सध्या संकटात सापडले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून बहुमतासाठी आमदारांच्या जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे काँग्रेसनं सचिन पायलट यांना पुन्हा परत पक्षात येण्यात आवाहन केलं आहे. मात्र हा सगळा वाद कोर्टात गेला आहे. दरम्यान वसुंधरा राजे यांनी या सगळ्या राजकीय नाट्यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस आपल्या घरातल्या वादात भाजपाला खेचत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.