scorecardresearch

‘कोची बिएनाले’वर ‘लांबणी’ची नामुष्की; दृश्यकलेचे महाप्रदर्शन १२ ऐवजी २३ डिसेंबरपासून नागरिकांसाठी खुले

या महाप्रदर्शनाचे उद्घाटन केरळचे मुख्यमंत्री पिनरायि विजयन यांनी संध्याकाळी केले खरे; पण २३ डिसेंबपर्यंत मुख्य दालने उघडणार नाहीत, हे सकाळीच जाहीर करण्यात आले.

‘कोची बिएनाले’वर ‘लांबणी’ची नामुष्की; दृश्यकलेचे महाप्रदर्शन १२ ऐवजी २३ डिसेंबरपासून नागरिकांसाठी खुले

अभिजीत ताम्हणे

कोची : भारतीय कलाजगतातील पहिलेच आणि जगाचे लक्ष वेधून घेणारे ‘कोची बिएनाले’ हे दृश्यकलेचे दर दोन वर्षांनी भरणारे महाप्रदर्शन यंदा कोणतेही कारण न देता लांबणीवर टाकले गेल्याचा धक्का अनेक चित्रकार व कलारसिकांना सोमवारी बसला.

या महाप्रदर्शनाचे उद्घाटन केरळचे मुख्यमंत्री पिनरायि विजयन यांनी संध्याकाळी केले खरे; पण २३ डिसेंबपर्यंत मुख्य दालने उघडणार नाहीत, हे सकाळीच जाहीर करण्यात आले. ‘‘ हे काय चालले आहे?’’, ‘‘ असे होऊच कसे शकते?’’ या प्रश्नांचा भडिमार आयोजकांनी दिवसभर पूर्णपणे टाळला! ‘ कोची बिएनाले’ चे एक संस्थापक आणि विख्यात चित्रकार बोस कृष्णम्माचारी यांनी सायंकाळच्या उद्घाटन सोहळय़ात करोनाकाळातील अडचणींचा पाढा वाचला; त्यामुळेच २०२० चे हे प्रदर्शन दोन वर्षे लांबणीवर पडून २०२२ मध्ये होत असल्याचाही उल्लेख केला आणि ‘‘गेल्या काही दिवसांत प्रचंड पाऊस पडल्यामुळे आम्ही प्रदर्शनाची मांडणीच करू शकलो नाही’’ असे कारण दिले.

केरळसाठी हे महाप्रदर्शन पर्यटनदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे आहे. राज्य सरकार यासाठी विविध स्वरूपात एकंदर सात कोटी रुपयांचा खर्चभार उचलणार आहे, असे मुख्यमंत्री पिनरायि विजयन यांनी जाहीर केले.

३५ टक्केच काम पूर्ण !

युरोप – ऑस्ट्रेलिया, कॅनडा , इंग्लंड, जर्मनी , सिंगापूर , अमेरिका आदी देशांतून तसेच देशभरच्या अनेक शहरांतून ‘‘१२ डिसेंबर’’ ही या प्रदर्शनाची नेहमी ठरलेली तारीख गाठण्यासाठी प्रवास करून आलेल्या कलाप्रेमींची चीडयुक्त- हताश कुजबूज दिवसभर,सुरू होती. आम्ही जी काही अर्धीमुर्धी ‘‘बिएनाले’’ मांडून तयार आहे तीही पाहू, असा हट्टच सकाळपासून तासभर ताटकळलेल्या सुमारे दीड डझन परदेशी कलाप्रेमींनी धरला. अखेर मुख्य दालने असलेल्या ‘‘अ‍ॅस्पिनवॉल हाउस’’ च्या आतील काही दालनांमध्ये प्रवेशही मिळाला. परंतु त्यांच्यासह आत शिरलेल्या ‘‘लोकसत्ता’’ प्रतिनिधीने पाहिले की, फार तर ३५ टक्के कलाकृतीच मांडून झाल्या होत्या!

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या