इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी २०२३ मधील त्यांच्या भारत दौऱ्यातील एक अतिशय रंजक आणि खास किस्सा शेअर केला आहे. “मी जर दिल्लीतून निवडणूक लढवली, तर मला १० लाखांपेक्षा जास्त मतं मिळतील,” असा गमतीशीर सल्ला त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना दिल्लीतील स्वागत पाहून दिला होता, अशी आठवण मेलोनी यांनी सांगितली आहे.

पत्रकार अलेस्सँड्रो साल्लुस्ती यांच्यासोबत झालेल्या संवादावर आधारित “जॉर्जियाज् व्हिजन” या त्यांच्या नव्या पुस्तकात त्यांनी हा खुलासा केला आहे.

दिल्लीच्या रस्त्यांवर मेलोनी यांचे पोस्टर्स आणि तो मजेशीर किस्सा

जॉर्जिया मेलोनी यांनी २०२३ मध्ये दोनदा भारताचा दौरा केला होता. मार्च २०२३ मध्ये ‘रायसिना डायलॉग’साठी त्या भारतात आल्या होत्या, तर सप्टेंबरमध्ये ‘जी-२०’ (G20) परिषदेसाठी त्या पुन्हा दिल्लीत आल्या होत्या. मार्चमधील दौऱ्याची आठवण सांगताना मेलोनी यांनी लिहिले आहे की, “मी जेव्हा दिल्लीत पोहोचले, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा माझे हसऱ्या चेहऱ्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यावर ‘वेलकम’ (स्वागत) असे लिहिले होते. आणि जेव्हा माझा दौरा संपला, तेव्हा त्याच पोस्टर्सवर ‘थँक यू फॉर व्हिजिटिंग’ (भेट दिल्याबद्दल धन्यवाद) असा संदेश होता. हे पाहून माझ्यासोबत आलेले इटलीचे उपपंतप्रधान अँटोनियो तायानी मिश्कीलपणे म्हणाले, ‘इतके पोस्टर्स पाहता, तुम्ही जर नवी दिल्लीच्या मतदारसंघातून निवडणूक लढवलीत, तर तुम्हाला सहज १० लाख मतं मिळतील!'”

‘सिगारेट ब्रेक’ आणि जागतिक नेत्यांशी मैत्रीचे ‘गुपित’

मेलोनी यांनी त्यांच्या पुस्तकातील ‘हेड हेल्ड हाय अमंग द वर्ल्ड ग्रेट्स’ (जागतिक दिग्गजांमध्ये अभिमानाने कामगिरी) या प्रकरणात आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीवर भाष्य केले आहे. यशस्वी परराष्ट्र धोरणासाठी केवळ औपचारिक नियमांमध्ये न अडकता, समोरील नेत्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधणे किती महत्त्वाचे असते, हे त्यांनी सांगितले आहे. “काहीवेळा एखादा मिश्कील शब्द, वैयक्तिक किस्सा किंवा समान आवड यामुळे दोन देशांमधील संबंध अधिक दृढ होतात,” असे मेलोनी यांनी नमूद केले.

या संदर्भातील काही रंजक प्रसंग त्यांनी पुस्तकात मांडले आहेत

ट्युनिशियाचे अध्यक्ष आणि ‘सिगारेट ब्रेक’: ट्युनिशियाचे अध्यक्ष कैस सइद यांच्यासोबतच्या पहिल्या बैठकीत सुमारे दोन तास गंभीर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी मेलोनी यांना समुद्रकिनाऱ्याचे दृश्य पाहण्यासाठी आमंत्रित केले. १३ वर्षांनंतर पुन्हा सिगारेट ओढण्यास सुरुवात केलेल्या मेलोनी यांनी किंचित संकोचत तिथे सिगारेट पेटवण्याची परवानगी मागितली. या एका साध्या गोष्टीमुळे वातावरणातील ताण हलका झाला. अध्यक्षांनी स्वतःचे सिगारेटचे पाकीट काढले आणि त्या ‘कॉफी-सिगारेट ब्रेक’मुळे दोघांमध्ये एक घट्ट मैत्रीचे नाते तयार झाले.

जपानकडून ‘हॅलो किटी’ आणि सर्बियाकडून गुलाब: जपानचे माजी पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी हिरोशिमा येथील जी-७ परिषदेदरम्यान मेलोनी यांच्या मुलीसाठी (जिनेव्‍हा) एक मोठी ‘हॅलो किटी’ बाहुली भेट दिली होती. तर सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांनी मेलोनी यांच्या वाढदिवसाला त्यांना भगव्या रंगाच्या गुलाबांचा गुच्छ पाठवून आश्चर्यचकित केले होते.

लॉर्ड ऑफ द रिंग्ज आणि पोलंडचे पंतप्रधान: पोलंडचे तत्कालीन पंतप्रधान मातेउश मोराविएत्स्की यांना मेलोनी यांच्या ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या काल्पनिक कथेवरील प्रेमाबद्दल माहीत होते. मेलोनी जेव्हा वॉर्सा येथे गेल्या, तेव्हा मोराविएत्स्की यांनी त्यांना खास ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’च्या थीमवर आधारित कॅफेमध्ये कॉफीसाठी नेले होते.

मेलोनींचे आत्मचरित्र थेट ‘उझबेकी’ भाषेत!

उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झीयोयेव यांनी तर मेलोनी यांच्या सन्मानार्थ एक मोठी कृती केली. रोममधील द्विपक्षीय बैठकीपूर्वी त्यांनी मेलोनी यांचे गाजलेले आत्मचरित्र “आय एम जॉर्जिया” चा थेट उझबेकी भाषेत अनुवाद करून घेतला आणि या पुस्तकाची एक विशेष प्रत मेलोनी यांना भेट दिली. या आदरातिथ्याने आपण भारावून गेलो होतो, असे मेलोनी यांनी पुस्तकात म्हटले आहे.

केवळ राजकीय घडामोडींवर मर्यादित न राहता, नेतृत्व, राष्ट्रीय अस्मिता, गुणवत्ता, कुटुंब, श्रद्धा आणि पाश्चात्य संस्कृतीचे भविष्य यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या पुस्तकात थेट भाष्य करण्यात आले आहे. सध्या हे पुस्तक ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.