दोघा भारतीय मच्छिमारांना सागरी चाचे असल्याच्या गैरसमजातून ठार मारल्याप्रकरणी, फेब्रुवारी महिन्यापासून भारताच्या कैदेत असलेल्या दोघा इटलीच्या नौदल अधिकाऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी इटलीतील भारतीय राजदूतांना पाचारण करण्यात आले. भारतीय मच्छिमारांच्या हत्येचे प्रकरण आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घडल्याने रोम येथे या प्रकरणावरील खटला चालविला जावा, अशी भूमिका इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे, तर सदर जहाज भारतीय सागरी हद्दीत असल्याने हा खटला भारतात चालविला जावा असे भारताचे म्हणणे आहे. खटला रोममध्ये चालविण्याविषयी करण्यात आलेल्या इटलीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देणे अपेक्षित आहे. सुनावणीस तीन महिने उलटूनही न्यायालयाकडून निकाल न आल्याबद्दल इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने खंत  व्यक्त केली.