काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी युनायटेड किंग्डममधील एका कार्यक्रमामधून माघार घेतली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना युनायटेड किंग्डममध्ये गेल्यानंतर क्वारंटाइन व्हावं लागणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. मात्र आपण हा असला अपनास्पद प्रकार सहन करणार नाही असं थरुर यांनी स्पष्ट करत कार्यक्रमास जाण्यास नकार दिलाय.

थरुर यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिलीय. “यामुळे मी केंब्रिज युनियनच्या चर्चासत्रामधून नाव मागे घेतलं आहे. तसेच मी युनायटेड किंग्डममधील माझ्या बॅटल ऑफ बिलाँगिंग (तिथे द स्ट्रगल फॉर इंडियाज सोल नावाने प्रकाशित) झालेल्या पुस्तक प्रकाशाच्या कार्यक्रमालाही मी जाणार नाहीय. पूर्णपणे लसीकरण झालेल्या भारतीयांना विलगीकरणामध्ये राहण्यास सांगणं हे आक्षेपार्ह (अपमानास्पद) आहे. ब्रिटीश यासंदर्भात फेरविचार करत आहेत,” असं थरुर यांनी म्हटलंय.

युनायटेड किंग्डममध्ये त्यांच्या देशामध्ये संपूर्ण लसीकरण करुन येणाऱ्या व्यक्तींवरील निर्बंध शिथिल करण्यात आले असून पूर्ण लसीकरण झालेल्यांना क्वारंटाइनची अट नाहीय. मात्र असत असतानाही भारतामधील सिरम इन्स्टीट्यूटची कोव्हिशिल्ड लस घेणाऱ्यांना उड्डाणापूर्वी पीसीआर चाचणी आणि युकेमध्ये उतरल्यानंतर इतर चाचण्या करणं बंधनकारक करण्यात आलंय.

युनायटेड किंग्डम सरकारने आफ्रिका, दक्षिण अमेरिका, युएई, भारत, तुर्की आणि इतर काही देशांमध्ये एखाद्या व्यक्तीने लसी घेतली असेल तरी त्याचं लसीकरण झालेलं नाही असं समजलं जाईल अशी घोषणा केलीय. अशा देशांमध्ये लस घेणाऱ्या व्यक्तींना युकेमध्ये गेल्यानंतर १० दिवस क्वारंटाइन रहावं लागणार असल्याचंही सरकारने म्हटलं आहे.

४ ऑक्टोबरपासून सध्या वापरण्यात येणारी रेड, ग्रीन आणि अंबर रंगांचा वापर करुन करोना संसंर्गाच्या धोक्यासंदर्भात देशांचं वर्गिकरण करण्याची पद्धत बंद करण्यात येणार असून केवळ रेड लिस्टेट देशांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं युकेनं स्पष्ट केलं आहे. तसेच नवीन नियमांमध्ये जापान, सिंगापूर आणि मलेशियामधून इंग्लंडमध्ये येणाऱ्यांना विमानात बसण्याआधी पीसीआर चाचणी करणं बंधनकारक नसणार.

सध्या ब्रिटनच्या रेड लिस्टेड देशांच्या यादीत पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांच्या समावेश आहे. तुर्की, मालदीव, इजिप्त, ओमान आणि केनिया या देशांचाही रेड लिस्टेड देशांच्या यादीत समावेश आहे.