सर्वपक्षीय बैठकीआधीच मेहबूबा मुफ्तींविरोधात आंदोलन; अटक करुन तिहार तुरुंगात टाकण्याची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज जम्मू काश्मीरमधील नेत्यांची बैठक होत आहे मात्र या बैठकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींचा विरोध केला जातोय

Protest Against Mehbooba Mufti
पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना तुरुंगात टाकण्याची मागणी आंदोलकांनी केली. (फोटो सौजन्य : एएनआय)

पूर्वाश्रमीच्या जम्मू-काश्मीर राज्याच्या ४ माजी मुख्यमंत्र्यांसह सध्याच्या या केंद्रशासित प्रदेशातील १४ नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक होत आहे. मात्र या बैठकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांचा विरोध करण्यास सुरुवात झालीय. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार डोग्रा फ्रंटने जम्मूमध्ये पिपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख असणाऱ्या मुफ्ती यांच्याविरोधात आंदोलन केलं आहे. एका आंदोलकाने दिलेल्या माहितीनुसार, “गुपकर गटाच्या बैठकीनंतर मुफ्ती यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. पाकिस्तान हा काश्मीर मुद्द्यामध्ये हिस्सेदार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यासाठी त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे.” मुफ्ती यांना अटक करुन तिहारच्या तुरुंगामध्ये ठेवावं अशी मागणी करणारी पोस्टर्स या आंदोलकांच्या हातात होती.

पाकिस्तानसहीत सर्वच पक्षांसोबत चर्चा करण्याच्या मुफ्ती यांच्या मागणीच्या विरोदात भाजपाच्या जम्मू-काश्मीरमधील अध्यक्ष रवींद्र रैना यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. भारत नेहमीच आपल्या शेजारच्या देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याच्या मताचा आहे. मात्र भारताची ही भूमिका म्हणजे दुबळेपणाची आहे असं इतरांनी समजू नये. “चर्चा आणि बंदूका एकाच वेळी काम करत नाहीत,” असंही रैना यांनी म्हटलं आहे.

भारताचे नेपाळ, श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान आणि अन्य देशांसोबत चांगले संबंध असल्याचंही रैना यांनी म्हटलं आहे. “पाकिस्तानबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी भारताविरोधात छुपं युद्ध छेडलं आहे. मात्र आपण त्यांना यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही. चर्चेमधून विश्वास निर्माण करता येईल. मात्र पाकिस्तानने भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी कधीच प्रयत्न केल्याचं दिसून आलं नाही,” असंही रैना यांनी म्हटलं आहे.

अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी मुफ्ती यांनी केलेली. जोपर्यंत हा अनुच्छेद पुन्हा लागू करत नाही तोपर्यंत जम्मू-काश्मीर मुद्द्यांवर उत्तर सापडणार नाही आणि या परिसरामध्ये शांतता निर्माण होणार नाही, असं मुफ्ती म्हणालेल्या. मंगळवारी मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्याच्या ‘बेकायदेशीर’ आणि ‘असंसदीय’ निर्णय मागे घेतल्याशिवाय या ठिकाणी शांतता प्रस्थापित होणार नाही. गुपक संघटनेच्या बैठकीनंतर त्यांनी राज्याला पुन्हा विशेष दर्जा देण्यात यावा यासाठी आपण पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत प्रयत्न करु असं मुफ्ती म्हणालेल्या. तसेच त्यांनी यावेळी विशेष राज्याच्या दर्जा आमच्याकडून खेचून घेण्यात आल्याचंही म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: J and k all party meet dogra front protest against pdp chief mehbooba mufti in jammu scsg