J P Nadda big claim Congress insiders involved in 2013 Jhiram Ghati Naxal attack : भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी काँग्रेसवर खळबळजनक आरोप केला आहे. २०१३ मध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या झिरम घाटी येथील हल्ल्यात “काँग्रेसचेच काही लोक सहभागी होते”, असा आरोप नड्डा यांनी केला आहे. बस्तर भागात झालेल्या या हल्ल्यात २०१४ विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची हत्या झाली होती. दरम्यान नड्डा यांनी केलेल्या या दाव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

नड्ड नेमकं काय म्हणाले?

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या नेतृ्त्वाखालील राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जांजगीर-चांपा जिल्ह्यात आयोजित ‘जनादेश परब’ या कार्यक्रमात बोलताना नड्डा यांनी हा दावा केला आहे. छत्तीसगड भाजपाचे प्रभारी म्हणून नड्डा यांनी काम केले होते. तेव्हा घडलेल्या घटनेबद्दल बोलताना नड्डा म्हणाले की, “…मी झिरम घाटीची घटना पाहिली आहे. मी पूर्ण जबाबदारीने सांगू इच्छितो की… झिरम घाटी घटनेची सविस्तर आणि आतली माहिती दुसर्‍या कोणीही नाही, तर त्यांच्यातील (काँग्रेस) अशा लोकांनी दिली ज्यांना आपल्याच लोकांचा हत्या करायची होती आणि जे नक्षलवाद्यांच्या संपर्कात होते. जर रक्षण करणारा स्वत:च अत्याचार करणारा बनला, तर छत्तीसगडच्या सामान्य लोकांचे काय होईल.”

मात्र जे. पी. नड्डा यांनी कथित कटाबद्दल अधिकची माहिती दिली नाही, तसेच त्यांनी यावेळी कोणाचे नावही घेतले नाही.

पुढे नड्डा यांनी राज्यात भाजपा सरकारने सुरू केलेल्या विकास कामांवर भाष्य केले. नड्डा यांनी राज्यातील नक्षलवाद जवळपास संपवत आणल्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिले. तसेच अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याची डेडलाईन निश्चित केली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या दोन वर्षात छत्तीसगडमधे ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या वर्षी २८४ माओवाद्यांना ठार करण्यात आले आहे, ज्यापैकी २५५ हे बस्तर भागातील आहेत. गेल्या वर्षी २१९ माओवाद्यांना ठार करण्यात आले होते, ज्यामध्ये २१७ हे बस्तर भागातील होते.

नड्डा यांनी सांगितले की, “गेल्या दोन वर्षांत जवळपास २५०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, १८५३ जणांना अटक करण्यात आली आहे, तर हिडमा आणि बसवराजू सारख्या वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांचा ठार करण्यात आला आहे.”

२०१३ मध्ये काय झाले होते?

२५ मे २०१३ मध्ये बस्तर जिल्ह्यातील काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीवेळी काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर माओवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये ३२ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंद कुमार पटेल, माजी विरोधीपक्ष नेते महेंद्र कर्मा, आणि माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ला यांचा समावेश होता.

या हल्ल्यातून आमदार कवासी लखमा हे बचावले होते. पण यानंतर ते कसे बचावले यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) सहा वेळा आमदार राहिलेल्या लखमा यांच्याविरोधात कटात सहभागी असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.