Jabalpur mother infant death investigation : मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यात बार्गी धरणात क्रूझ बोट बुडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या नऊ झाली आहे. गुरुवारी झालेल्या दुर्घटनेनंतर चार मृतदेह सापडले होते. त्यानंतर आणखी पाच मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या दुर्घटनेतील सर्वात एक फोटो अत्यंत हृदयद्रावक ठरला आहे. या फोटोमध्ये एकमेकांना घट्ट मिठी मारलेल्या अवस्थेत आई आणि तिच्या चार वर्षांचा मुलगा दिसत आहे. बचावकर्त्यांनी अशाच अवस्थेत हे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, या फोटोतील महिलेच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
दुर्घटना टाळता आली असती
हसत-खेळत कौटुंबिक सहलीचा आनंद घेत असताना एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. अपघातानंतर एका आईचा कुशीत लहान मुलाला घेतल्याचा मृतदेह आढळून आला. हा फोटो पाहून हृदय पिळवटून निघाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. या महिलेचं नाव मरिना असून त्यांचा चुलत भाऊ विनोद म्हणाले, “माझे कुटुंबीय तिथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. स्थानिक प्रशासनाने थोडी अधिक खबरदारी घ्यायला हवी होती. गेल्या २-३ दिवसांपासून हवामान बिघडू शकते असा इशारा देण्यात आला होता. असे असूनही, तिथे क्रूझ चालवण्याची परवानगी का देण्यात आली? नेमक्या याच कारणामुळे एवढी मोठी शोकांतिका घडली. ही दुर्घटना टाळता आली असती.”
क्रूझ जुनी होती
मरिनाच्या भावाने ग्लॅडविनने म्हटले आहे की, “ही शोकांतिका माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटुंबातील तीन सदस्य – माझी बहीण, माझी आई आणि माझ्या बहिणीचा चार वर्षांचा मुलगा या अपघातात मृत्युमुखी पडले. ही संपूर्ण घटना केवळ निष्काळजीपणामुळे घडली आहे. तिथल्या लोकांनी क्रूझ पुढे न नेण्याबद्दल चेतावणी दिली होती, तरीही त्यांनी ती पुढे नेलीच. ती क्रूझ बरीच जुनी होती. याच कारणामुळे ही दुर्घटना घडली.”
दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत २८ पर्यटकांना वाचवण्यात यश आले असून सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. लष्करी तुकडी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथके बेपत्ता पर्यटकांचा शोध घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बार्गी धरण हे नर्मदा नदीवर बांधण्यात आले आहे. धरणाच्या पाण्यामध्ये नौकाविहार करण्यास पर्यटक पसंती देत असतात.
