पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षातील नेते या शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शपथविधीआधी धनखड यांनी दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. “राजघाटावरील निर्मळ आणि शांत वातावरणात पूज्य बापुंचा आशिर्वाद घेतल्यानंतर धन्य वाटले” अशी भावना या भेटीनंतर धनखड यांनी व्यक्त केली. या भेटीचा व्हिडीओ त्यांनी ट्वीट केला आहे.

७ ऑगस्टला पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा प्रचंड मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत धनखड यांना ५२८ मते मिळाली होती. तर अल्वा यांना केवळ १८२ मतांवर समाधान मानावे लागले होते. धनखड यांना मिळालेल्या एकुण मतांची टक्केवारी ७३ एवढी होती.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेतील ७८० सदस्य मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी ७२५ सदस्यांनी मतदान केले. ५५ सदस्यांनी मतदान केले नाही. त्यापैकी ७१० मते पात्र ठरली, तर १५ मतांना अपात्र ठरवण्यात आले. विजयी होण्यासाठी पहिल्या क्रमांकाची ३५६ मतांची आवश्यकता होती. बहुमतापेक्षा १७२ मते जास्त मिळवत धनखड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला.

देशाचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांची निवड; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

या निवडणुकीत मतदानापासून दूर राहणार असल्याचे तृणमुल काँग्रेसने आधीच जाहीर केले होते. त्यामुळे दोन्ही सभागृहातील तृणमुलच्या ३७ खासदारांनी मतदान केले नाही. विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना या निवडणुकीत केवळ २७ टक्के मते मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, आपसह तेलंगणा राष्ट्र समिती आदींनी अल्वा यांना पाठिंबा दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagdeep dhankhar took oath as a new vice president of india from president draupadi murmu rvs
First published on: 11-08-2022 at 14:01 IST