Sanjay Raut Unlikely Paradise Book Jagdeep Dhankhar Resignation Controversy: शिवसेनेचे (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी तुरूंगात असताना लिहिलेले आत्मचरित्र आता इंग्रजीत प्रकाशित झाले आहेत. यापूर्वी त्यांचे नरकातला स्वर्ग हे मराठी भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले होते, यात त्यांनी तुरूंगात घालवलेल्या १०० दिवसांचा आढावा घेतला होता. आता त्यांच्या ‘अनलाइकली पॅराडाईज’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले आहे.

संजय राऊत यांनी इंग्रजी आवृत्तीच्या नव्या पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पदावरून दूर करण्यासाठी मोदी सरकारने दबाव टाकला. धनखड स्वतंत्रपणे निर्णय घेत होते, त्यांची ही कार्यशैली एनडए सरकारला मान्य नव्हती. त्यामुळे त्यांना बाजूला सारण्यात आले. संजय राऊत यांनी गेल्या वर्षी लिहिलेल्या पुस्तकात नवीन प्रकरणे जोडली आहेत. यात त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवायांबद्दल लिहिले आहे, ज्यामुळे या यंत्रणेला ‘भाजपची शाखा’ हे टोपणनाव मिळाले. तसेच, केंद्र सरकारने भारतीय निवडणूक आयोग सारख्या लोकशाही संस्थांविरुद्ध याचा कसा वापर केला आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावर राजीनामा देण्यासाठी कसा दबाव आणला, याचे वर्णन त्यांनी केले आहे.

​पुस्तकातील चारपैकी ‘सुप्रीम कोर्ट विरुद्ध ईडी’ आणि ‘निवडणूक आयोगाच्या दारी आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान’ ही दोन प्रकरणे प्रामुख्याने ईडी आणि संबंधित विषयांवर केंद्रित आहेत. सोमवारी (दि. २३ मार्च) दिल्लीत आप पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

संजय राऊत यांचा दावा काय?

संजय राऊत यांनी लिहिले, “अशा अफवा होत्या की धनखड आणि त्यांच्या पत्नीने त्यांचे जयपूरमधील निवासस्थान विकले होते आणि त्यातील काही रक्कम परदेशात हस्तांतरित केली होती. ईडी त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होती आणि इतर तपास यंत्रणांच्या मदतीने माजी उपराष्ट्रपतींविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी एक फाईल तयार केल्याचा आरोप आहे. जेव्हा धनखड यांनी मोदी सरकारविरुद्ध काही स्वतंत्र राजकीय पावले उचलल्याची कुणकुण लागली, तेव्हा ईडीने कथितपणे ही फाईल त्यांच्यासमोर ठेवली आणि त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला. सुरुवातीला त्यांनी याला नकार दिल्याने त्यांच्यावर पाळत वाढवण्यात आली, ज्यामुळे ते उघडपणे अस्वस्थ दिसू लागले.”

भाजपाकडून प्रत्युत्तर

संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देताना भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, केवळ पुस्तकात काहीतरी लिहिले आहे म्हणून ते सत्य होत नाही; अशा गंभीर आरोपांसाठी ठोस पुरावे, अधिकृत कागदपत्रे किंवा संबंधित व्यक्तींच्या स्पष्ट विधानांची आवश्यकता असते. उच्च घटनात्मक पदांवर सेवा बजावलेल्या व्यक्तींवर असे आरोप करणे म्हणजे देशाच्या संस्थांबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”

​माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मात्र या विषयापासून लांब राहणेच पसंत केले. अलीकडेच त्यांनी राजीनाम्याबाबत बोलताना म्हटले होते की, त्यांनी प्रत्यक्षात प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता.