नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड विजयी झाले असून त्यांनी विरोधी पक्षांच्या सर्वसंमत उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा अपेक्षेप्रमाणे पराभव केला.

उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत ९३ टक्के मतदान झाले. धनखड यांना ५२८ मते मिळाली, तर अल्वा यांना १८२ मते मिळाली. धनखड यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ७३ एवढी आहे.

उपराष्ट्रपतीपदासाठी संसदेच्या दोन्ही सदनांतील सदस्यांना मतदान करता येते. दोन्ही सदनांतील ७८८ पैकी राज्यसभेतील ८ नियुक्त सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ७८० सदस्य मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी ७२५ सदस्यांनी मतदान केले. ५५ सदस्यांनी मतदान केले नाही. ७१० मते पात्र ठरली, तर १५ मते अपात्र ठरली. ९७.९३ टक्के मते वैध ठरली. विजयी होण्यासाठी पहिल्या क्रमांकाची ३५६ मतांची आवश्यकता होती. बहुमतापेक्षा १७२ मते धनखड यांना अधिक मिळाली.

तृणमूल काँग्रेसने मतदानात भाग न देता गैरहजर राहणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. दोन्ही सभागृहांतील तृणमूलच्या ३७ खासदारांनी मतदान केले नाही. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुबेंदू अधिकारी यांचे वडील आणि खासदार शिशिर अधिकारी तसेच, बंधू दिबेंदू यांनी धनखड यांना मतदान केले. याशिवाय भाजपचे सनी देओल, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यांच्यासह काही खासदारही मतदानासाठी संसद भवनात आले नाहीत.

भाजपकडे दोन्ही सदनांत मिळून राज्यसभेतील पाच नियुक्त खासदारांसह ३९१ संख्याबळ आहे. शिवाय, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, शिंदे गटातील १२, बहुजन समाज पक्ष, तेलुगु देसम, अकाली दल या पक्षांनीही धनखड यांना पािठबा दिला. या पक्षांच्या ८१ सदस्यांची मतेही एनडीएच्या पारडय़ात पडली. त्यामुळे धनखड यांना ५२८ मते मिळू शकली.

विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना २७ टक्के मते मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, आप, तसेच तेलंगण राष्ट्र समिती आदींनी  अल्वा यांना पािठबा दिला होता. यापूर्वी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोपाल कृष्ण गांधी यांना ३२ टक्के मते मिळाली होती. अल्वा यांना मात्र जेमतेम २७ टक्के मते मिळवता आली.

महाराष्ट्रातील ७ खासदार गैरहजर

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील लोकसभेतील पाचही खासदारांनी मतदान केले नाही. विनायक राऊत, अरिवद सावंत, राजन विचारे, संजय जाधव आणि गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे खासदार गैरहजर राहिले. राज्यसभेतील खासदार संजय राऊत ईडीच्या कोठडीत असल्याने त्यांनाही मतदान करता आले नाही. प्रकृतीच्या कारणास्तव अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हेही अनुपस्थित राहिले. शिंदे गटातील १२ खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.