पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे तुरुंगात भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली होती. दरम्यान इम्रान खान यांच्यापासून घटस्फोट घेतलेल्या त्यांच्या दुसऱ्या पत्नीने एका अब्जाधीशासह लग्न केलं आहे. जेमिमा गोल्डस्मिथ यांचा विवाह इम्रान खान यांच्याशी झाला होता. पण या दोघांचं नातं ९ वर्षांहून अधिक काळ टिकलं नाही. ज्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला. आता जेमिमा गोल्डस्मिथ यांनी अब्जाधीश आयरिश-ऑस्ट्रेलियन फायनान्सर कॅमेरॉन ओ’रायली यांच्यासह विवाह केला आहे.
जेमिमा आणि कॅमेरॉन ओ’रायली’ यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल
६२ वर्षीय कॅमेरॉन ओ’रायली हे दिवंगत मीडिया उद्योगपती आणि माजी आंतरराष्ट्रीय रग्बीपटू सर अँथनी ओ’रायली यांचे पुत्र आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जवळपास दशकभर वडिलांच्या मीडिया व्यवसायात काम केले. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियातील एपीएन न्यूज अँड मीडिया येथे विविध पदांवर काम केले. २००३ मध्ये कॅमेरॉन यांनी बेयार्ड कॅपिटल या खासगी इक्विटी कंपनीची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने स्विस मीटरिंग कंपनी लँडिस+जीवायआरचे अधिग्रहण केले. कंपनीचे सीईओ म्हणून काम केल्यानंतर त्यांनी २०११ मध्ये ही कंपनी तोशिबाला तब्बल २.३ अब्ज डॉलरमध्ये विकली. जेमिमा आणि कॅमेरॉन यांच्या लग्नाला त्यांचे जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. कॅमेरॉन यांना चार मुले आहेत, तर जेमिमा आणि इम्रान खान यांना सुलेमान आणि कासिम हे दोन मुलगे आहेत. जेमिमा यांचा भाऊ बेन गोल्डस्मिथ यांनी या विवाहाला दुजोरा दिला आहे.
इम्रान खान आणि जेमिमा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला
जेमिमा गोल्डस्मिथ आणि इम्रान खान यांनी १९९५ मध्ये लग्न केले होते. जवळपास नऊ वर्षांच्या संसारानंतर २००४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००५ मध्ये त्यांच्या घटस्फोटाला औपचारिक स्वरूप मिळाले. दोघांना सुलेमान आणि कासिम हे दोन मुलगे आहेत. इम्रान खानपासून विभक्त झाल्यानंतर जेमिमाचे नाव ब्रिटिश मनोरंजन क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्तींशी जोडले गेले.
जेमिमा यांच्या लग्नाची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा इम्रान खान हे २०२३ पासून तुरुंगात आहेत. पाकिस्तानमध्ये सरकार असताना भ्रष्टाचार केल्याच्या आरोपात त्यांना सत्ता गेल्यानंतर तुरुंगवास भोगावा लागला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी २०२३ मध्ये त्यांना तुरुंगवास झाला. इम्रान खान यांनी हे आरोप सातत्याने फेटाळले असून, आपल्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. अलीकडे त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या वकिलांनी तुरुंगात त्यांची प्रकृती खालावत असल्याचा दावा केला आहे.
