राष्ट्रसंत जैन मुनी तरूण सागर महाराज यांचे निधन

५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राष्ट्रसंत जैन मुनी तरूण सागर महाराज यांचे दिल्लीमध्ये शनिवारी पहाटे 3 वाजता त्यांचं निधन झालं आहे. ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  गेल्या २० दिवसांपासून तरूण सागर काविळीने त्रस्त होते. कावीळेमुळे तरूण सागर यांना अशक्तपणा आला होता. पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला. तरूण सागर महाराज यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून त्यांचे भक्त जमण्यास सुरूवात झाली आहे. आज दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या २० दिवसांपूर्वी त्यांना काविळ झाली होती. त्यामुळे त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृतीत सुधारणाच होत नसल्यामुळे तरुण सागर यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी जाऊन संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणं

अतिशय कडव्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच तरुण सागर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजताच त्यांच्या लाखो अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक कुप्रथांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे मुनी अशी तरुण सागर यांची ओळख होती.

मुनी तरुण सागर यांचं नाव पवन कुमार जैन आहे. त्यांचा जन्म 26 जून 1967 रोजी मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गुहजी गावात झाला. त्यांच्या आईचं नाव शांतीबाई आणि वडिलांचं नाव प्रताप चंद्र आहे. मुनीश्री तरुण सागर यांनी 8 मार्च 1981 रोजी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली.

तरुण सागर यांनी मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेतही प्रवचन दिलं होतं. हरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मध्य प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जाही दिला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jain muni tarun sagar passed away this morning in delhi he was 51 years old