जयपूर : कुठल्याही फॅसिस्ट… हुकूमशाही संघटनेत कवी जन्माला येत नाही, हा इतिहास आहे. कारण फॅसिस्टांची भाषा ही द्वेषाची असते, त्यात प्रेमाला जागा नाही. आणि कवितेला तर फक्त आणि फक्त प्रेमाची भाषा समजते. द्वेष करणाऱ्यांना प्रेमाची भाषा कशी बरे आकळेल?… असे परखड प्रश्न उपस्थित करून प्रख्यात कवी, लेखक जावेद अख्तर यांनी गुरुवारी जणू भोवतालाचीच समीक्षा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८ व्या जयपूर साहित्य महोत्सवाला आज हॉटेल क्लार्क्स आमेर येथे सुरुवात झाली त्यावेळी कवी जावेद अख्तर बोलत होते. ‘ज्ञान- सीपिया… पर्ल्स ऑफ विजडम’ या कार्यक्रमात त्यांच्या ‘सीपिया’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी लेखक व अभिनेता अतुल तिवारी यांनी त्यांना बोलतं केलं. या पुस्तकात जुन्या निवडक दोह्यांचं अभ्यासपूर्ण संकलन जावेद अख्तर यांनी केलं आहे. जावेद अख्तर यांना ऐकण्यासाठी बुजुर्ग मंडळीच नव्हे तर तरुण वर्गानेही गर्दी केली होती.

आजच्या काळात दोह्यांवर पुस्तक लिहावंसं का वाटलं? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘माझे मित्र विक्रम मेहरा यांनीच मला दोह्यांविषयी लिहायला प्रेरित केलं. ते टाटा स्कायचे सीईओ होते तेव्हा दोह्यांवर काम करण्यास सुचवलं. मी दोह्यांविषयी लोकांना सांगितलं तर त्याविषयी लोकांमध्ये पुन्हा कुतूहल निर्माण होईल. त्यांचं बोलणं मी मनावर घेतलं आणि त्यावर कामही सुरू केलं. आपल्याकडे काही दोहे हे सातशे-आठशे वर्षांपूर्वीचे आहेत. विशेष म्हणजे त्यांना धर्म-जात-परंपरा यांचं कुठलंही कुंपण नाही. मग ते दोहे रहीमचे असोत, कबिराचे की तुलसीदास यांचे… त्यात कविता, मूल्य, शिकवण यांचं पावित्र्य आहे. हे दोहे म्हणजे ज्ञानाचे मौलिक मोतीच.’’ हे सांगताना त्यांनी रहीम आणि तुलसीदास यांच्यातील हृद्या नातंही उलगडलं. तसंच कवितेतील कवीला ज्ञात नसलेलं, पण कवीने कवितेत नकळत उतरवलेलं मात्रांचं व्याकरणही सोप्या भाषेत समजावून सांगितलं. जावेद अख्तर यांचे अभ्यासपूर्ण भाषण, शेलक्या भाषेत सद्या:स्थितीवरील टिप्पणी, दर्दी श्रोत्यांची मनमुराद दाद यामुळे या कार्यक्रमाला रंगत आली.

हा तर साहित्याचा महाकुंभ मेळा

सध्या प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ मेळा समस्त भारतीयांचा चर्चेचा विषय… परंतु गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर शहरात साहित्य महाकुंभमेळा भरला आहे. या साहित्य उत्सवाला देशातूनच नव्हे तर जगभरातून नामांकित पुरस्कारप्राप्त लेखक, विचारवंत हजेरी लावतात. पाच दिवस हा साहित्यमेळा सुरू राहणार आहे.

कथेत एआय माणसाच्या भावना कशा व्यक्त करेल बरं? सुधा मूर्ती

एआय तुम्हाला तुमच्या कामात मदत करेल, तुमचं काम सुकर करेल, तो कथा लिहीलही, पण तो त्यात माणसाच्या भावभावना कशा व्यक्त करेल बरं? माणसाचे मन एआयपेक्षा वेगळं आहे, त्यामुळे एआय माणसाच्या भावभावनांची जागा घेऊ शकणार नाही, तो त्या कथांमध्ये त्याचं मन ओतू शकणार नाही, ही कला फक्त माणसालाच जमेल, असे प्रतिपादन लेखिका सुधा मूर्ती यांनी केले. १८ व्या जयपूर साहित्य महोत्सवात ‘दि चाइल्ड विदइन’ या कार्यक्रमात मेरू गोखले यांनी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्या वेळी त्या बोलत होत्या. गोष्ट सांगणे ही वेगळी कला आहे. त्यात भारतीय कथांचं वेगळंपण अधिक आहे. कथा सांगणं, ती ऐकणं हा माणसाचा स्थायीभाव आहे, त्यामुळे कथांना, कथनाला मरण नाही, एआयमुळे ही कला लुप्त होईल याची भीती बाळगायची गरज नाही, असे त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaipur literature festival javed akhtar statement on dictatorship jaypur amy