Jaipur Man Murders Wife Three Daughters: जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने ४० वर्षीय पत्नी आणि आपल्याच तीन लहान मुलींचा खून केला आहे. चारही जणांच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून आणि तोंडावर वार करून खून करण्यात आल्याचे इंडियन एक्सप्रेसने पोलिसांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. वृत्तात पुढे दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने सकाळी वडिलांना चहा दिला आणि घरातून पसार झाला. दरम्यान, सध्या जयपूर पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.
पत्नी आणि तीन मुलींची हत्या
सकाळी १० वाजता राहुल झा याने आपली पत्नी गीता झा (४०) आणि तीन मुलींची (दोन अल्पवयीन होत्या) हत्या केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त (पश्चिम) प्रशांत किरण यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी वडिलांना चहा दिला आणि राहुल घरातून पसार झाला.
पोलिस काय म्हणाले?
“या परिसरात तीन मृतदेह आढळल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि राहुल झा याचा शोध घेत आहोत, तो फोन घरीच सोडून फरार झाला आहे,” असे डीसीपी किरण यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. गीता यांचा मृतदेह पहिल्या मजल्यावरील खोलीत सापडला, तर तीन मुलींचे मृतदेह तळमजल्यावरील दोन खोल्यांमध्ये आढळले. राहुलने त्याची पत्नी आणि मुली झोपेत असतानाच त्यांची हत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संशियताच्या वडिलांनी काय माहिती दिली?
हत्या पहाटेच्या वेळी झाल्याचा संशय पोलिसांचा आहे, पण तपासात अधिक माहिती समोर येईल, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हत्येसाठी वापरण्यात आलेला दगड पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीने सकाळी ७ वाजता दुधवाल्याकडून दूध घेतले होते. “मुलाने मला चहा दिल्यानंतर तो घरातून निघून गेला. तो बाजारात जात असावा असे मला वाटले. मी वॉशरूममधून बाहेर आलो, तेव्हा मला खोलीत रक्त दिसले, मी रडू लागलो आणि शेजाऱ्यांना माहिती दिली,” असे संशयिताचे वडील लक्ष्मीनाथ झा यांनी म्हटले आहे.
पोलिसांचा संशय
पोलिसांना घरात रस्ते बांधकामात वापरले जाणारे दोन सिमेंटचे ब्लॉक देखील सापडले आहेत. “त्याने हल्ला करण्यासाठी या ब्लॉकचा वापर केला असा आम्हाला संशय आहे. पीडित आणि आरोपी यांच्यात झटापट झाल्याच्या काही खुणा आढळल्या आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. फॉरेन्सिक अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल,” असे जयपूरचे पोलिस अधीक्षक मित्तल म्हणाले. गीता घराच्या पहिल्या मजल्यावर ब्युटी पार्लर चालवत होत्या. तिन्ही मुली शिक्षण घेत होत्या. २२ वर्षांची नंदिनी ही एक मुलगी शिक्षण घेण्यासोबतच एका खासगी कंपनीत काम करत होती, तर उर्वरित दोन अल्पवयीन मुली अजूनही शाळेत शिकत होत्या, असे पोलिसांनी म्हटले आहे.
