Jaipur Temple Priest Assault Case CCTV Footage: मंदिरात शिरून दोन तरुणांनी एका महिलेच्या मदतीने मंदिरातील वृद्ध पुजाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्ही फूटेज सध्या व्हायरल होत असून त्यात एक तरुण वृद्ध पुजाऱ्याशी वाद घालता घालता बेदम मारहाण करू लागल्याचं दिसत आहे. शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी जयपूरमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी पुजाऱ्याच्या तक्रारीवरून तातडीने पावलं उचलत संबंधित दोघा तरुणांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, जयपूरच्या निवारू रोडवरील गणेश नगर मेन परिसरात हे मंदिर आहे. मारहाण झालेल्या वृद्ध पुजाऱ्याचं नाव पंडित रामकृष्ण असल्याची माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. समोर आलेल्या घटनाक्रमानुसार, पंडित रामकृष्ण हे शुक्रवारी मंदिरात पूजा करत होते. लाऊडस्पीकरवर पूजेच्या मोठ्या आवाजामुळे आरोपी हरीश व आरोपी देवांश यांना त्रास होऊ लागला. त्यांनी मंदिरात येऊन पुजारी रामकृष्ण यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.

जयपूर घटनेच्या CCTV फूटेजमध्ये नेमकं काय?

सुरुवातीला असणारा शाब्दिक वाद हळूहळू हमरीतुमरीवर आला. या घटनेचं CCTV फूटेज सध्या व्हायरल होत असून त्यात नेमका घटनाक्रम दिसून येत आहे. आरोपी तरुण हे अंगावर धावून आल्याचं पाहून पंडित रामकृष्ण यांनी सदर तरुणाला दूर ढकललं. यामुळे अधिकच संतप्त होऊन तरुणाने थेट पंडित रामकृष्ण यांना मारहाण करायला सुरुवात केली.

या मारहाणीत नंतर एक महिलादेखील सामील झाल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून येत आहे.

पंडित रामकृष्ण यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी करधानी पोलीस स्थानकाबाहेर धरणे आंदोलन केले. तसेच, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. रामकृष्ण यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित दोघा तरुणांना अटक केली आहे. यासंदर्भात सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.