Jaipur Woman Gets Mother Killed : जयपूरमधील प्रताप नगर भागात ३ जुलै रोजी घडलेल्या एक धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालयीन लिपिक असलेल्या ४५ वर्षीय नीरज शर्मा यांची कारने चिरडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी नीरज यांची मुलगी आयुषी शर्मा हिच्यासह सात जणांना अटक केली असून, एक आरोपी अजूनही फरार आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अपघात नव्हे, पूर्वनियोजित कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज शर्मा या आपल्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडून घरी परतत असताना सुमारे १३० किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या एका स्कॉर्पिओ कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्या १०० फूट दूर फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक गाडीसह पळून गेला. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा संशय पोलिसांना आला. तपासादरम्यान कौटुंबिक कट आणि भाडोत्री मारेकऱ्यांचा सहभाग उघडकीस आला.

हत्येमागचं कारण काय?

डीसीपी रंजिता शर्मा यांनी सांगितलं की, नीरज यांच्या पतीचं सुमारे एका वर्षापूर्वी निधन झालं. पतीच्या निधनानंतर नीरज यांना अनुकंपा तत्त्वावर न्यायालयात कनिष्ठ लिपिक (LDC) म्हणून नोकरी मिळाली. मुलगी आयुषीला स्वतःला ती सरकारी नोकरी हवी होती, मात्र नीरज यांनी स्वतः ती नोकरी स्वीकारली. याशिवाय, गेल्या २-३ वर्षांपासून आई आणि मुलीमध्ये मालमत्तेवरूनही वाद सुरू होता.

७ लाखांची दिली सुपारी

नोकरी आणि मालमत्ता हस्तगत करण्यासाठी आयुषीने तिचे काका मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम उर्फ रवी यांच्यासोबत मिळून आईला संपवण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी भरतपूर येथील हेमंत शर्मा याला ७ लाख रुपयांची सुपारी दिली. आरोपींनी सुरुवातीला भाड्याने घेतलेल्या थार गाडीतून नीरज यांची रेकी केली, पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर महिनाभर पाळत ठेवून अखेर स्कॉर्पिओ कारने हा हल्ला करण्यात आला.

३ जुलै रोजी आरोपी हेमंत शर्मा नीरज यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. रोहित जाटव दुचाकीसह जवळच थांबला होता. आकाश शर्मा स्कॉर्पिओ चालवत होता, तर अरविंद शर्मा त्याच्यासोबत गाडीत बसला होता. नीरज यांना धडक दिल्यानंतर आरोपींनी स्कॉर्पिओ तिथेच सोडली आणि दुचाकीवरून पळ काढला. नीरज यांचे भाऊ राकेश कुमार शर्मा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. नीरज यांनी यापूर्वीच मुलगी, सासरचे लोक आणि चुलत भावाकडून मालमत्तेसाठी त्रास दिला जात असल्याची आणि जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार केली होती, असं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी आयुषी शर्मा, मोहन स्वरूप, मोहित शर्मा, आकाश शर्मा, अरविंद शर्मा, हेमंत शर्मा आणि रोहित जाटव यांना अटक केली आहे. तर या कटातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा बलराम उर्फ रवी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.