पीटीआय, नवी दिल्ली

“चीनबरोबरची भारताची व्यापार तूट मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) त्याचा फटका बसत आहे. असे असतानाही केंद्र सरकार चीनबाबत मवाळ भूमिका घेत आहे,” असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी समाजमाध्यमातील संदेशात या संदर्भाने मोदी सरकारवर टीका केली आहे.

भारतातील सीमाभागात कारखाने असलेल्या काही चिनी वीज-उपकरण कंपन्यांना महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांच्या सरकारी निविदांमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिल्याच्या वृत्ताचा हवाला त्यांनी दिला आहे. जयराम रमेश म्हणाले की, चीनबरोबरची वाढती व्यापार तूट भारतीय उद्योगांसाठी, विशेषतः एमएसएमई क्षेत्रासाठी, चिंतेची बाब आहे. तरीही सरकार चीनसमोर जाणीवपूर्वक माघार घेत असल्याचे दिसत आहे.

जयराम रमेश यांनी अरुणाचल प्रदेश आणि ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित बाबींचा उल्लेख करत चीनमध्ये सुरू असणाऱ्या प्रकल्पांमुळे देशाच्या जलसुरक्षेवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. पूर्व लडाखच्या काही भागांत गस्त पशुपालनाच्या हक्कांना बाधा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. २०२० मध्ये लडाखमध्ये जो संघर्ष झाला त्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी मवाळ भूमिका घेतल्याचेही ते म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांमध्ये चीनच्या भूमिकेचा उल्लेख लष्कराच्या उपप्रमुखांनी केला होता, मात्र सरकारने चीनच्या बाबतीत कठोर भूमिका घेण्याचे टाळले, असाही आरोप त्यांनी केला.