नवी दिल्ली : “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधी पक्षांनी फोडण्याचे निकराचे प्रयत्न करत असून त्यासह ‘इंडिया’ आघाडीसमोरील सर्व आव्हानांचा आम्ही सामना करू आणि त्यावर मात करू,” असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले. ‘इंडिया आघाडी’चा उल्लेख ‘इंडिया जनबंधन’ असा करत, ही आघाडी राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढवण्यासाठी आहे आणि आघाडीकडे रचनात्मक अजेंडा आहे, असे रमेश म्हणाले.

‘इंडिया’चा घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसमधील फूट हा आघाडीला बसलेला धक्का आहे, तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे याचा आम्हाला दोन महिन्यांपूर्वींपर्यंत अंदाज आला नव्हता, अशी कबुली रमेश यांनी दिली. अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांविरोधात निवडणूक लढवली होती. त्याबद्दल बोलताना, “ही आघाडी राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढवण्यासाठी आहे” असे रमेश यांनी स्पष्ट केले. ‘इंडिया’ आघाडीची ८ जूनला झालेली बैठक महत्त्वाची होती, असेही त्यांनी सांगितले.

आम आदमी पक्ष, माकप यासारख्या पक्षांविरोधात आम्ही राज्यांमध्ये निवडणूक लढवली. पण, संसदेत घटनादुरुस्ती विधेयकाला सर्वांनी एकत्रित विरोध केला, असे रमेश यांनी लक्षात आणून दिले.

अर्थव्यवस्था, केंद्र-राज्य संबंध, राज्यघटनेचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवर इंडिया आघाडीकडे रचनात्मक अजेंडा आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये आम्हाला आव्हानांना सामोरे जायचे आहे. – जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस

‘निवडणुकांवर बहिष्कार नाही’

‘इंडिया’ आघाडी किंवा काँग्रेसने २०२९च्या लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची शक्यता रमेश यांनी फेटाळून लावली. आम्हाला सत्ताधारी पक्षाच्या जोडीने निवडणूक आयोगाविरोधातही लढावे लागत असल्याचे सांगताना त्यांनी क्रिकेटमधील प्रतिस्पर्धी संघ आणि पंचांचे उदाहरण दिले. “आम्ही प्रतिस्पर्धी संघ आणि पंचांविरोधात खेळत आहोत,” असे रमेश म्हणाले.