नवी दिल्ली : देशात २०१६ मध्ये ८ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेली नोटबंदी म्हणजे निश्चलनीकरणाचा निर्णय ही सर्वात मोठी धोरणात्मक चूक होती, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली आहे. 

त्यांनी सोमवारी असा दावा केला, की वस्तू व सेवा कर कायद्याची अंमलबजावणी घाईने व विस्कळीतपणे करण्यात आल्याने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. रमेश यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे, की जाणाऱ्या प्रत्येक वर्षांगणिक   हा निर्णय जागतिक आर्थिक इतिहासातील किती चुकीचा व घातक  होता हे स्पष्ट होत आहे. निश्चलनीकरण आणि जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कराची घाईने अंमलबजावणी यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले, की माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरिवद सुब्रमणियन यांनी  एक आलेख सादर केला असून त्यातून डिजिटलच्या गाजावाजातही रोख रक्कम व्यवहारात पुन्हा वापरात आल्याचे म्हटले आहे.  रमेश यांनी   मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले आहे, की निश्चलनीकरण म्हणजे रोख  रक्कम विरहित अर्थव्यवस्था असे प्रथम सांगण्यात आले, पण आता देशातील अर्थव्यवस्थेत निश्चलनीकरणापूर्वी होती तेवढी रोख रक्कम वापरात आली आहे.