नवीन संसद भवनातील पाच दिवसीय विशेष अधिवेशनाची सांगता झाली आहे. पण, नव्या संसद भवनातील त्रूटी दर्शवत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. जुन्या संसद भवनापेक्षा नव्या संसदेत खासदारांना संवाद साधण्यासाठी जागा राहिली नाही. तसेच, कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या सुविधाही मिळत नाहीत, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे.
२०२४ मध्ये सत्तातरानंतर नवीन संसद भवनाचा अधिक चांगला वापर करण्याचा मार्ग शोधला जाईल, असेही जयराम रमेश यांनी सांगितलं.
‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर जयराम रमेश म्हणाले, “नवीन संसदेला खरेतर ‘मोदी मल्टी कॉम्प्लेक्स’ किंवा ‘मोदी मॅरियट’ म्हटलं पाहिजे. संसदेत एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कोणतीही जागा राहिली नाही. लोकसभा आणि राज्यसभेच्या आवारतही हीच परिस्थिती आहे.”
हेही वाचा : लोकसभेत शिवीगाळ झालेल्या मुस्लीम खासदाराची राहुल गांधींनी घेतली भेट, भावूक होत बसपा नेते म्हणाले…
“नवीन संसदेची इमारतच लोकशाहीची हत्या करू शकते. तर, पंतप्रधानांना नवीन संविधान लिहिण्याची गरज नाही. सभागृह आरामदायक नाही आहे. तसेच, खासदारांना एकमेकांना पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज लागते,” असा टोला जयराम रमेश यांनी लगावला आहे.
हेही वाचा : चीनने अरुणाचलच्या खेळाडूंना व्हिसा नाकारला, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांचा ‘हा’ मोठा निर्णय
जयराम रमेश यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “काँग्रेसची मानसिकता वाईट आहे. १४० कोटी भारतीयांचा हा अपमान आहे. संसदेला विरोध करण्याची काँग्रेसची ही पहिलीच वेळ नाही. १९७५ मध्येही काँग्रेसने असा प्रयत्न केला होता. पण, त्यांना अपयश आले,” असं जे.पी. नड्डा यांनी ‘एक्स’ अकाउंटवर म्हटलं आहे.