पीटीआय, नवी दिल्ली
‘कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यातील संबंधांबाबत खूप चर्चा केली जाते. पंतप्रधान नेहरूंनी २६ जून १९५९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती विवियन बोस यांना लिहिलेले हे एक विलक्षण माफीपत्र आहे. नेहरू खरोखरच किती थोर संस्था निर्माता होते’, असे कौतुकोद्गार काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शुक्रवारी ‘एक्स’वरून काढले. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी बोस यांना लिहिलेले पत्रही रमेश यांनी प्रसृत केले.
‘गेल्या अनेक दिवसांपासून मी सतत दौऱ्यावर आहे. एका पत्रकार परिषदेत मी केलेल्या काही विधानांच्या संदर्भात तुम्हाला आधीच पत्र लिहिण्याचा माझा विचार होता, परंतु प्रवासामुळे मला ते शक्य झाले नाही.’ ‘काही दिवसांपूर्वी जेव्हा मी त्रिवेंद्रममध्ये होतो, तेव्हा मला कलकत्ता बार लायब्ररी क्लबच्या मानद सचिवांचे एक पत्र मिळाले. त्याबरोबर त्यांनी कलकत्ता बारच्या बैठकीत मंजूर केलेला एक ठराव पाठवला होता, ज्यामध्ये मी तुमच्याबद्दल केलेल्या काही विधानांचा निषेध करण्यात आला होता. हे पत्र मिळताच मी कलकत्ता बार लायब्ररी क्लबच्या सचिवांना उत्तर पाठवले.’
‘या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी केलेल्या विधानांबद्दल मला मनापासून खेद वाटतो, हे मी स्वतः तुम्हाला सांगू इच्छितो. मला पूर्ण जाणीव आहे की ती विधाने अयोग्य होती आणि मी ती करायला नको होती. मी केलेल्या या चुकीबद्दल तुम्ही माझी माफी स्वीकाराल, अशी मला खात्री आहे,’ असे नेहरूंनी पत्रात नमूद केले होते.
