जैसलमेर या ठिकाणी एका विवाहितेला जिवंत जाळण्यात आलं. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार घेत असताना या विवाहितेचा मृत्यू झाला. ज्यानंतर विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी तिच्या पतीसह सासरच्या लोकांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा, जादू टोणा केल्याचा आणि जमीन हडपण्याचा आरोप केला आहे. ज्यानंतर या महिलेच्या पतीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या जैसलमेर या ठिकाणी ही घटना घडली आहे.
नेमकी काय घटना घडली?
राजस्थानच्या जैसलमेर या ठिकाणी हिना नावाच्या एका विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. ही घटना खुहडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरवा गावात घडली. या महिलेला जेव्हा जाळण्यात आलं तेव्हा ती ९० टक्के भाजली होती. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारांच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. तिला सुरूवातीला जैसलमेरच्या रूग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर तिला जोधपूरला नेण्यात आलं. पण तिचा जीव वाचू शकला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ जून २०१२ ला हिनाचं लग्न भगवानरामशी झालं होतं. लग्नानंतर काही काळापर्यंत सगळ्या गोष्टी सुरळीत चालल्या होत्या. पण नंतर तिचा तिच्या पतीकडून, सासूकडून, सासऱ्याकडून आणि दिराकडून छळ सुरू झाला. तुझ्या घरून पैसे आण आणि हुंड्यात कार का दिली नाही? म्हणून हा छळ सुरू झाला होता. त्यानंतर आता तिला पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. हिनाच्या घरातल्यांनी यानंतर तक्रार केली असून यानंतर हिनाच्या पतीसह चौघांना अटक केली आहे.
हिनाच्या वडिलांनी नेमका काय आरोप केला आहे?
हिनाच्या वडिलांनी हा आरोप केला आहे की हिनाच्या जावेने म्हणजेच अमृताने हिनाच्या विरोधात कट रचला होता. हिनाला तिच्या पतीला भेटू नकोस असं अमृता सांगत होती. तसंच तू एकटी राहा असंही सांगत होती. तिच्यावर जादूटोणाही करण्यात आला होता. हिनाच्या वडिलांनी आरोप केला आहे की अमृताला हे वाटत होतं की हिनाला मूल होऊ नये. म्हणजे हिनाच्या नवऱ्याच्या जागेवर तिला कब्जा मिळवता येईल. कुटुंबाने असंही सांगितलं आहे की हिनाला काही औषधं दिली गेली ज्यामुळे तिचा गर्भपातही झाला होता. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली होती असंही तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. हिनाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता असंही तिच्या घरातल्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिनाला याच सगळ्या छळातून जाळण्यात आलं. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कट रचणे, हत्या, जमिनीचा वाद, जादू टोणा केल्या प्रकरणात आम्ही हिनाच्या पतीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील चौकशी करण्यात येते आहे.
