Jaishankar Raises US Visa Issues with Marco Rubio : अमेरिकेच्या कायम नागरिकत्वासाठी आवश्यक असलेल्या ग्रीन कार्डसाठी नियम बदलणार आहेत. यामुळे अमेरिकेत स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना भारतात परतून व्हिसासाठी अर्ज करावा लागणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली. मार्को रुबियो सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.

भारतामधून वैध मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यात येणाऱ्या अडचणींवर मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आधी द्विपक्षीय शिष्टमंडळ पातळीवर चर्चा झाली. त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा गाभा दोन्ही देशांतील लोकांचे परस्परांमधील संबंध हाच आहे. मी परराष्ट्र मंत्री रुबिओ यांना वैध प्रवाशांना व्हिसा मिळवताना येणाऱ्या अडचणींची कल्पना दिली. बेकायदेशीर आणि अनियमित स्थलांतराला रोखण्यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करत असलो, तरी याचा विपरित परिणाम कायदेशीर प्रवासावर होणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. सरतेशेवटी, आपल्या दोन्ही देशांमधील व्यवसाय, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे”, असं जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

भारताला लक्ष्य केलेलं नाही

यानंतर जे-१ (J1), एफ-१ (F1) आणि एच-१बी (H-1B) व्हिसासह विविध अमेरिकेच्या व्हिसा श्रेणींमध्ये अलीकडेच झालेल्या बदलांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रुबिओ यांनी स्पष्ट केलं की, वॉशिंग्टनच्या इमिग्रेशन नियमांमधील हे मोठे बदल भारताला लक्ष्य करून केलेले नाहीत. ही यंत्रणा भारताला लक्ष्य करून तयार केलेली नाही; तर ती जागतिक स्तरावर लागू केली जात आहे. परंतु, सध्या आम्ही एका बदलाच्या टप्प्यातून जात आहोत आणि अशा काळात सुरुवातीला काही अडचणी येणे स्वाभाविक आहे.”

अमेरिकेत २ कोटींहून अधिक लोकांचा अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश

रुबिओ यांनी नमूद केलं की, अमेरिका सध्या आपल्या इमिग्रेशन (स्थलांतर) व्यवस्थेचे आधुनिकीकरण करत आहे. अमेरिकेत सध्या स्थलांतराचं मोठं संकट निर्माण झाले आहे. हे भारतामुळे झालेलं नाही, तर गेल्या काही वर्षांत २ कोटींहून अधिक लोकांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला आहे आणि आम्हाला या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन या व्यवस्थेचे आधुनिकीकरण पूर्ण केल्यानंतर, ही इमिग्रेशन यंत्रणा भारतीयांसाठी काही बाबतीत अधिक फायदेशीर ठरेल, अशी आशाही रुबिओ यांनी व्यक्त केली.

“एकदा आमचं काम पूर्ण झालं आणि आम्ही या व्यवस्थेचं आधुनिकीकरण केलं की, मला वाटतं आपण एका अत्यंत कार्यक्षम आणि आधीच्या व्यवस्थेपेक्षाही उत्तम असलेल्या प्रणालीकडे जाऊ. काही बाबतीत तर ही नवीन यंत्रणा अमेरिकेत काम आणि नाविन्यपूर्ण संशोधन (इनोव्हेशन) करण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी पूर्वीपेक्षाही अधिक फायदेशीर ठरू शकते”, असं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

रुबिओ आग्रा आणि जयपूरला भेट देणार

रुबिओ हे शनिवार, २३ मे रोजी भारतात दाखल झाले. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात कोलकाता येथून केली. तिथे त्यांनी ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’च्या मुख्यालयाला भेट दिली. यानंतर ते नवी दिल्लीला रवाना झाले. ते नवी दिल्लीला परतण्यापूर्वी आग्रा आणि जयपूरला भेट देणार आहेत. नवी दिल्लीत परतल्यानंतर ते भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश असलेल्या आगामी ‘क्वाड’ (Quad) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील.