S Jaishankar UN speech Pakistan : शनिवारी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या (UNGA) ८१ व्या अधिवेशनात बोलताना, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तान हा “दहशतवादाचा सराईत पुरस्कर्ता” असल्याचे म्हटलं आहे. तसंच, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आदल्या दिवशी केलेल्या भाषणात “तथ्यांचा विपर्यास” केल्याचा आरोपही त्यांनी केला.

पाकिस्तानचे थेट नाव न घेता, जयशंकर म्हणाले की, “काल या असेंब्लीसमोर दहशतवादाचा सराईत पुरस्कर्ता असलेल्या देशाने तथ्यांचा विपर्यास केला. दहशतवादाचं समर्थन करण्यासाठी आणि त्याच्या परिणामांपासून सूट मिळवण्यासाठी युक्तिवाद करण्यात आले. परंतु, ते टिकणार नाही. दहशतवादाविरुद्ध स्वतःचं रक्षण करण्याचा आमचा अधिकार आम्ही नक्कीच वापरू. मैत्री आणि सदिच्छा कधीही दहशतवादासोबत राहू शकत नाही. दहशतवाद थांबवल्याशिवाय दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होऊ शकत नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “हा दहशतवाद राज्य पुरस्कृत असू शकतो आणि तो सीमापार उद्देशाने केला जातो, ज्यामुळे जागतिक व्यवस्थेला थेट आव्हान मिळते. अशा कृत्यांमध्ये गुंतलेल्या सरकारांना जबाबदार धरलेच पाहिजे. दहशतवादाविरुद्धच्या आमच्या ‘झिरो-टॉलरन्स’ (शून्य सहनशीलता) दृष्टिकोनात कोणतीही सवलत दिली जाणार नाही. विशेषतः, दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा उघड केला पाहिजे आणि त्याचा मुकाबला केला पाहिजे.”

शाहबाज शरीफ नेमकं काय म्हणाले होते?

शुक्रवारी शाहबाज शरीफ यांनी मे महिन्यातील लष्करी संघर्षाचा उल्लेख केला होता. त्यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला बाह्य आक्रमण म्हटलं होतं आणि पाकिस्तानच्या कारवाईचं समर्थन केलं होतं. तसंच, त्यांनी पाकिस्तानच्या सशस्त्र दलांचं कौतुक केलं होतं. शरीफ यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या “वेळेवर हस्तक्षेपा”बद्दल त्यांचे आभार मानले होते. ट्रम्प यांनी नंतर हा ८७ सेकंदांचा व्हिडिओ कोणत्याही टिप्पणीशिवाय ‘ट्रुथ सोशल’वर शेअर केला होता.

भारताची भूमिका

भारताने गेल्या वर्षी ७ मे रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. नवी दिल्लीने ट्रम्प यांचा हस्तक्षेपाचा दावा “फेटाळून लावला असून, पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सच्या डायरेक्टर जनरल (DGMO) यांच्या विनंतीनंतरच हे ऑपरेशन थांबवण्यात आले होते, असे स्पष्ट केले आहे.