पोलिसांनी चेन्नईत जाळपोळ केल्याचे व्हिडिओ व्हायरल, कमल हसनने मागितले स्पष्टीकरण

जलिकट्टूवर बंदी नको, नियमन हवे असे कमल हसनने म्हटले आहे.

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi, jallikattu kamal hasan police action police commissioner o paneerselvam
चेन्नईच्या पोलिसांनीच जाळपोळीत सहभाग घेतल्याचे व्हिडिओ येथील स्थानिक वाहिन्यांवर प्रसारित झाले आहेत.

जलिकट्टूवरील बंदी उठवून कायम स्वरुपात हा खेळ खेळता यावा यासाठी चेन्नईच्या लोकांनी जागोजागी निदर्शने केली. काही ठिकाणी या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. जनतेबरोबरच येथील स्थानिक पोलिसांनी देखील सार्वजनिक मालमत्ता आणि वाहनांची जाळपोळ केल्याचे व्हिडिओ स्थानिक वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात येत आहेत. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर हे व्हिडिओ शेअर केले जात आहे. प्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये पोलीस जाळपोळ करताना दिसत आहे. कमल हसन यांनी याबाबतचे स्पष्टीकरण सरकारकडे मागितले आहे.

वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आलेले व्हिडिओ हे खोटे असल्याचे चेन्नईचे पोलीस आयुक्त एस. जॉर्ज यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ बनावट असण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले. या व्हिडिओची सीडी आम्ही सायबर क्राइमकडे पाठवली आहे असे ते म्हणाले. पोलिसांनी उलट दंगे आणि जाळपोळ पसरू नये यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्याचे आयुक्तांनी म्हटले. हा व्हिडिओ मरिना बीच जवळील मैलापूरचा असल्याचे म्हटले जात आहे.

हा व्हिडिओ पाहून आपल्याला तीव्र धक्का बसल्याचे कमल हसनने म्हटले आहे. जलिकट्टूवर बंदी घालणे हा उपाय नसल्याचे कमल हसनने म्हटले. कशावरही बंदी घालू नका. त्याचे नियमन करा असे आपले म्हणणे आहे असे कमल हसनने म्हटले. कमल हसनने अगदी सुरुवातीच्या काळापासून या खेळाचे समर्थन केले आहे. हा खेळ तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे. या खेळाला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे तेव्हा या खेळावर बंदी घालणे हे अयोग्य असल्याचे कमल हसनने म्हटले. लोकशाहीमध्ये लोकांच्या भावनांचा आदर व्हायला हवा असे देखील कमल हसनने म्हटले होते.

जर जलिकट्टूवर बंदी घालायची असेल तर बिर्याणीवरही घाला असे कमल हसनने म्हटले होते तर पेटाने त्यांना हवे ते हक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेत जाऊन मागावेत असे देखील त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांमध्ये चेन्नईमध्ये जलिकट्टूच्या समर्थनार्थ हजारो लोक रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. जलिकट्टूवर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये बंदी घातली होती. ही बंदी उठविण्यात यावी यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. सरकारने अध्यादेश काढल्यानंतर हा खेळ जागोजागी खेळला गेला. गेल्या काही दिवसांमध्ये तामिळनाडूमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jallikattu kamal hasan police action police commissioner o paneerselvam