जलीकट्टूला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने तामिळनाडूमध्ये जागोजागी निषेध नोंदवला गेला. तामिळनाडूतील दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या भागातील जिल्ह्यांमध्ये अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मदुराई, दिंडिगूल आणि तंजावूर जिल्ह्यातील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोंगल उत्सवादरम्यान आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला. मदुराई जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये निषेध म्हणून काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

जलीकट्टूसाठी प्रसिद्ध असलेल्या मदुराई जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा बंदोबस्त असून देखील काही ठिकाणी प्रतिकात्मक स्वरुपात जलीकट्टू हा खेळ खेळला गेला. सर्वोच्च न्यायालयाचे नियम धुडकावून लावत हा खेळ खेळला गेल्यामुळे आतापर्यंत १४९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मदुराईमधील पेलामदू या ठिकाणी गावकऱ्यांनी परंपरागत पद्धतीने पूजा करुन पोंगल हा सण साजरा केला. गावकऱ्यांनी प्रतिकात्मक स्वरुपात जलीकट्टू हा खेळ देखील खेळला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे या करिता आम्ही येथे कडक बंदोबस्त ठेवला आहे. जनतेनी नियमांचे पालन करावे आणि शांततेत हा उत्सव साजरा करावा असे आवाहन आम्ही केले आहे असे मदुराईचे पोलीस अधीक्षक विजयेंद्र बिदारी यांनी म्हटले आहे. जलीकट्टू या खेळाला सुमारे २,००० वर्षांची परंपरा आहे. बैलाच्या शिंगाला पैसे बांधून त्या बैलाला पळवले जाते. जी व्यक्ती पळणाऱ्या बैलाच्या शिंगावरुन पैसे काढेल ती व्यक्ती विजयी ठरवली जाते. या खेळामध्ये बैलांवर अत्याचार होतो तसेच आतापर्यंत अनेक जण या खेळामध्ये जखमी झाले आहेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी घातली होती.

 

बंदी उठविण्यात यावी यासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी करीत स्थानिक लोक तसेच काही राजकारण्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता. या खेळाला परवानगी देण्यात यावी असे म्हणत अण्णा द्रमुक पक्षाच्या महासचिव शशिकला यांनी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत असे म्हटले होते. न्यायालयाने जे आदेश दिले त्यानुसार केंद्र सरकार या खेळाबाबत निर्णय घेईल असे म्हटले होते. शनिवारी पोंगल सण होता. त्याआधीच जलीकट्टूबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने द्यावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात टाकली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.