भद्रवाह/ जम्मू : जम्मू- काश्मीरच्या डोडा जिल्ह्य़ात बटोट- किश्तवार महामार्गावर एक मिनी बस गुरुवारी रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळल्याने या बसमध्ये प्रवास करणारे ११ जण ठार, तर १४ जण जखमी झाले.

ठाठरी येथून डोडाकडे जात असलेली ही बस सोई- ग्वारीनजीक दरीत कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही मिनी बस चिनाब नदीच्या किनाऱ्यावर खाली कोसळली. सकाळच्या वेळी झालेल्या या अपघातात बसचा चालकही ठार झाला.

पोलीस, लष्कर व एसडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमींना डोडातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात आणण्यात आलेल्या २५ जणांपैकी ९ जणांना मृत घोषित करण्यात आले, तर दोन जण नंतर मरण पावले, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. युधवीर सिंह यांनी सांगितले. दोन मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.

जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना विशेष उपचारासाठी हवाई रुग्णवाहिकेने जम्मूतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातातील जीवहानीबद्दल दु:ख व्यक्त केले असून, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही शोक व्यक्त केला.