हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वानीचा जुलै २०१६ मध्ये सुरक्षा दलांनी खात्मा केला असला तरी यानंतर स्थानिक तरुणांचे दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ११७ तरुण दहशतवादी संघटनेत सामील झाले आहेत.

‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारी ते डिसेंबर २०१७ पर्यंत ११७ स्थानिक तरुण दहशतवादी संघटनेत सामील झाले आहेत. २०१६ मध्ये हेच प्रमाण ८८ एवढे होते. दक्षिण काश्मीरमधून दहशतवादी संघटनेत भरती होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे दहशतवादी संघटनेकडे तरुणांचा कल वाढत असताना दुसीरकडे जम्मू- काश्मीर पोलीस, निमलष्करी दल आणि सैन्यातर्फे दहशतवादी संघटनेत भरती होणाऱ्या तरुणांच्या ‘घरवापसी’साठी विशेष मोहीम देखील राबवली जाते. दक्षिण काश्मीरमधील माजिद अर्शिद खान या तरुणाने दहशतवादी संघटना सोडून पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. आईने भावनिक आवाहन केल्यानंतर तो घरी परतला होता. यासाठी स्थानिक पोलिसांनी विशेष मेहनत घेतली होती.

दहशतवादी संघटनेत भरती झालेल्यांमध्ये अनंतनागमधील १२, पुलवामा आणि अवंतीपोरामधील ४५, शोपियानमधील २४ आणि कुलगाममधील १२ तरुणांचा समावेश आहेत. जुलै २०१६ मध्ये बुरहान वानीचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर जम्मू काश्मीर धुमसत होता. सैन्य आणि पोलिसांवर दगडफेकीच्या घटना वाढत होत्या. याचा फायदा दहशतवादी संघटनांनी घेतला आणि तरुणांची माथी भडकवण्याचे उद्योग या दहशतवादी संघटनांनी केले, असे सांगितले जाते. दहशतवादी संघटनेत गेलेले बहुसंख्य तरुण हे मध्यम वर्गातील असून काश्मीरमधील दहशतवादाचा नवीन चेहरा म्हणून तरुणांचा वापर होण्याची शक्यता आहे. यातील काही तरुण हे उच्चशिक्षित असल्याचे समजते.