Omar Abdullah Nidhi Razdan Marriage: जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि माजी पत्रकार निधी राजदान यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. “काल एका नव्या प्रवासाची सुरूवात झाली”, असे कॅप्शन लिहून ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर निधी राजदान यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. तसेच या पोस्टमध्ये निधी राजदान यांना टॅग केले आहे. दरम्यान हे फोटो लग्नानंतरचे आहेत की साखरपुड्यानंतरचे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांपूर्वीच ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या विभक्त पत्नी पायल अब्दुल्ला यांचा घटस्फोटास मंजुरी दिल्यानंतर अब्दुल्ला यांनी आपल्या नात्याची वाच्यता केली आहे. ३१ जुलै २०२६ रोजी दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने आपले नातेसंबंध संपवून प्रलंबित वाद सहमतीने मिटवण्यास मान्यता दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा विवाह रद्दबातल ठरवला.

कोण आहेत निधी राजदान?

माजी पत्रकार असलेल्या निधी राजदान एनडीटीव्हीच्या वरिष्ठ संपादक होत्या. वृत्त निवेदका आणि ‘लेफ्ट, राइट आणि सेंटर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना त्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा ‘द बिग फाइट’ हा शोदेखील बराच लोकप्रिय होता. जुलै २०१७ साली त्यांनी “लेफ्ट, राइट आणि सेंटर: द आयडिया ऑफ इंडिया”, हे पुस्तकदेखील लिहिले होते.

निधी राजदान यांचा जन्म ११ एप्रिल १९७७ साली झाला होता. त्यांचे कुटुंबीय जम्मू-काश्मीरच्या बडगाव येथील असून ते कश्मीरी पंडित असल्याचे सांगितले जाते.

ओमर अब्दुल्ला यांच्या पहिल्या लग्नाबद्दल

ओमर अब्दुल्ला आणि पायल नाथ यांचे लग्न सप्टेंबर १९९४ मध्ये झाले होते. मात्र वैयक्तिक मतभेदांमुळे १७ वर्षांपासून ते एकमेकांपासून विभक्त राहत होते. ३० ऑगस्ट २०१६ रोजी कुटुंब न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर २०२३ साली ओमर अब्दुल्ला दिल्ली उच्च न्यायालयात गेले. मात्र तिथेही त्यांची घटस्फोट याचिका फेटाळून लावली गेली. ओमर अब्दुल्ला व पत्नी पायल अब्दुल्ला यांना दोन मुलं आहेत.

त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडली. “दोन्ही पक्षांमधील सर्व प्रलंबित वाद आता पूर्णपणे मिटले आहेत. दोघांनीही आपापल्या नव्या आयुष्याचा आणि स्वातंत्र्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळे न्यायालयाने आता या घटस्फोटाला अधिकृत मंजुरी द्यावी, आम्ही दाखल केलेल्या सर्व याचिका मागे घेत आहोत”, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.