पीटीआय, नवी दिल्ली, श्रीनगर
जम्मू आणि काश्मीरमध्ये तपास यंत्रणांनी ‘आर्थिक मध्यस्थी’च्या अनेक खात्यांचे (म्यूल अकाउंट्स) जाळे उद्ध्वस्त केले आहे. या खात्यांतून झालेल्या उलाढालीचा पैसा देशविरोधी आणि फुटिरतावादी कारवायांसाठी वापरला जाऊ शकतो, अशी भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
अशा प्रकारची बँक खाती एका ठिकाणाहून दुसरीकडे थेट आर्थिक व्यवहार करण्याऐवजी मध्यस्थीची खाती म्हणून काम करतात. व्यवहारांत संशय येऊ नये म्हणून अशा खात्यांचा वापर केला जातो. अधिकाऱ्यांनी सांगितले, की गेल्या तीन वर्षांत या भागात अशा प्रकारची आठ हजारांहून अधिक खाती गोठविण्यात आली आहेत. सायबर गुन्ह्यांच्या साखळीतील ही अकाउंट्स महत्त्वाच्या दुवा ठरू शकतात. कारण या बँक खात्याशिवाय चोरलेल्या पैशांचे रूपांतर क्रिप्टो चलनात करणे अशक्य असते, असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.
बँकांनी अशा खात्यांना वाढू देऊ नये, अशा सूचना जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि इतर तपास यंत्रणांनी त्यांना द्याव्यात, असे केंद्रीय तपास यंत्रणांनी म्हटले आहे.
