काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने शनिवारी सकाळी लष्कर ए तोएबाचा टॉप कमांडर बशीर लष्करीसह दोन दहशतवाद्यांना यमसदनास धाडले. गेल्या महिन्यात सहा पोलिसांना जिवे मारण्याच्या घटनेत बशीरचाही समावेश होता. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा पर्याय बनलेल्या बुरहान वानी आणि सबझार अहमद बटच्या खात्म्यानंतर भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश असल्याचे मानले जाते.

शनिवारी सकाळी सुरक्षा दलांनी लष्करी आणि इतर ३ दहशतवाद्यांना एका घरात घेरले होते. पण स्थानिक लोकांच्या विरोधामुळे जवानांना ऑपरेशन राबवण्यात मोठी अडचण येत होती. अशा परिस्थितीतही जवानांना बशीर लष्करीला ठार करण्यात यश मिळाले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एका महिलेसमवेत दोन नागरिकांचाही मृत्यू झाला.

बशीर लष्करी आणि तीन इतर दहशतवादी अनंतनाग येथील ब्रेन्ती गावात सुरक्षा दलाच्या सापळ्यात अडकले होते. दि. १६ जून रोजी दक्षिण काश्मीरमधील अचाबल परिसरात एक अधिकारी तसेच पाच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना मारण्याच्या घटनेत हे दहशतवादी सामाली होते, अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली.

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी राबवण्यात आलेल्या अभियानादरम्यान झालेल्या चकमकीवेळी झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. या ४४ वर्षीय महिलेचे नाव ताहिरा असे होते. गोळी लागल्यानंतर तिला रूग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला होता.

प्रवक्ता म्हणाला, शोध मोहिमेवेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही बाजून गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांनी स्वत:च्या बचावासाठी स्थानिक लोकांचा ‘मानवी ढाल’ म्हणून उपयोग करत आहेत. लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दहशतवाद्यांविरोधात अभियान सुरूच ठेवले आहे.