जम्मू-काश्मीर मधील बांदीपुरा जिल्ह्यात आज (रविवार) झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलं. या दोन दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याचा भाजपा नेते वसीम बारी, त्यांचे वडील व भावाच्या हत्येत सहभाग होता. तर, अन्य एका दहशतवाद्यास पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण मिळाले होते. चकमक झालेल्या ठिकाणाहून शस्त्र, स्फोटकांसह अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. चकमकीनंतर संबंधित परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आलेली आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितल्यानुसार, जवानांना उत्तर काश्मीरमधील बांदीपुरा येथील वटनीरा भागात दहशतवाद्यांच्या ठिकाणाची माहिती मिळाली होती. ज्यानंतर परिसरास वेढा देऊन शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. दरम्यान, परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांना जवानांची चाहूल लागताच, त्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांकडून देखील चोख प्रत्युत्तर दिले गेले. ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यापैकी एकजण हा भाजपा नेत्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येत सहभागी होता.

भाजपाचे बांदीपोरा जिल्हाध्यक्ष वसीम बारी, त्यांचे वडील आणि भावाची ७ जुलै रोजी गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. काश्मारीचे आयजीपी विजय कुमार यांनी दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती दिली आहे.