Jammu Kashmir BJP Leader Ravinder Raina reel controversy : भाजपाच्या वरिष्ठ नेते रविंद्र रैना यांनी एक रील पोस्ट केली आहे. या रीलमध्ये ते त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांसह बर्फावर पळताना दिसत आहेत. दरम्यान या रीलनंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले रैना हे जम्मू काश्मीर भाजपाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार आहेत. दरम्यानकाल त्यांनी सोशल मीडियावर एक शॉर्ट व्हिडीओ अपलोड केला होता, ज्यामध्ये रैना हे बर्फावर पळताना दिसत आहेत आणि त्यांच्या मागे किमान ५ लष्कराचे हत्यारबंद जवान धावत आहेत. या रीलमध्ये रैना हे हसताना दिसत आहेत. तसेच या रीलच्या बॅकग्राऊंडला गुलाल चित्रपटातील पीयूष मिश्रा यांच्या आवाजातील ‘आरंभ है प्रचंड’ हे गाणे वाजत आहे. या व्हिडीओला रैना यांनी ‘जय हिंद’ असं कॅप्शन दिलं आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काहीच दिवस उलटले असताना ही रील पोस्ट करण्यात आल्याने विरोधकांनी यावर हल्ला चढवला आहे. सुरक्षेसाठी तैनात केलेल्या जवानांचा गैरवापर केल्याचा आरोप करत विरोधकांनी रैना यांना सुनावले आहे.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सुप्रिया श्रीनाते या म्हणाल्या की, पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश दु:खात बुडाला आहे. “कोणीतरी त्यांचा तरूण मुलगा गमावला आहे, कोणी वडील, तर कोणी पती गमावला आहे. आणि हा व्यक्ती बागडण्याच्या मूडमध्ये आहे? तो रील शूट करत आहे? सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गैरवापर करत आहे? त्यांच्यात इतकी निर्लज्जता कुठून येते? असंवेदनशीलता हे भाजपाचे वैशिष्ट्य आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा प्रमुख जेपी नड्डा यांना उद्देशून ते यावर गप्प बसतील का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “रील गेम ऑन पॉइंट. तुमच्याकडे अशी सुरक्षा असेल तर एक रील तर झालीच पाहिजे. सुरक्षा दल सीमांचे रक्षण नंतर करू शकतात, भाजपा वाल्यांना वाचवणे खूप गरजेचे आहे,” असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसशी संबंधित अनेक सोशल मीडिया हँडलवरून रील बनवणाऱ्या भाजपा नेत्यावर टीका करण्यात आली आहे. दरम्यान भाजपा नेते रैना यांनी मात्र अद्याप आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.