जम्मू-काश्मीरमधील डोडा परिसरातील एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नदीवरील एका पुलावरून एका मुलीने चिनाब नदीत उडी मारल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडीओत काय दिसत आहे?

जम्मू-काश्मीरमधील डोडा येथील एका पुलावरून एक तरुणी चिनाब नदीत उडी मारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी त्या पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचं टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती लोक तिला करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, तरीही तिने कोणाचंही ऐकलं नाही आणि शेवटी नदीत उडी मारली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

‘बाय-बाय पापा’ म्हटलं अन्…

समोर आलेल्या वृत्तानुसार, उडी मारण्यापूर्वी या तरुणीने आसपासच्या लोकांना आपण आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. यावेळी ती फोनवर वडिलांशी बोलताना तिचे शेवटचे शब्द “बाय-बाय पापा” असे होते. तिचं नाव पायल असं असून ती एका यात्रेतून परतत असताना आणि गावातीलच एका व्यक्तीबरोबर ती दुचाकीवरून घरी जात असताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वृत्तानुसार, यात्रेतून परतत असताना पायलची ओढणी दुचाकीमध्ये अडकली. ती ओढणी काढण्यासाठी दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीने गाडी थांबवली. मात्र, त्यानंतर ही तरुणी अचानक थेट पुलाच्या कडेला गेली आणि त्या ठिकाणी असलेल्या लोकांना तिने सांगितलं की आपण जीवन संपवणार आहोत. यावेळी पुलावरील लोकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, तसेच अशा प्रकारचं टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती केली.

तिच्या वडिलांनी तिच्याशी फोनवर संवाद साधून तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही तिने ऐकलं नाही. तिने सांगितलं की हे तिचं आयुष्य आहे आणि तिने ते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलांशी बोलताना तिचे शेवटचे शब्द “बाय-बाय पापा” असे होते आणि त्यानंतर तिने नदीत उडी मारली.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी या तरुणीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मात्र, वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत तिचा शोध लागलेला नव्हता. चिनाब नदीत तिचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांकडून सुरू आहेत.