जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्हातील एका तरूणाला आपल्या जाळ्यात ओढुन, त्याच्याकडून गुप्त माहिती काढण्याचा पाकिस्तानी ‘आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेचा डाव यशस्वी होवू शकला नाही. एका महिलेच्या नावाने आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट आणि पैशांच्या आमिषाला बळी न पडता , या तरुणाने देशाशी गद्दारी करण्यास स्पष्ट नकार दिला.

अशी झाली मैत्रीची सुरुवात

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या तरुणाने आपल्या परिसरातील बर्फवृष्टीचा एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. या व्हिडिओवर एका महिलेने कमेंट केली. तिने स्वत: काश्मीरची असल्याचे सांगितले. हळूहळू त्यांच्यात फेसबुकवर गप्पा सुरू झाल्या आणि मार्च महिन्यात त्या महिलेने या तरुणाचा व्हॉट्सॲप नंबर मागितला.

+९२ कोड दिसताच उडाला गोंधळ

जेव्हा त्या महिलेने व्हॉट्सॲपवर मेसेज केला, तेव्हा तिचा नंबर +९२ पाकिस्तानचा कंट्री कोड ने सुरू होत असल्याचे तरुणाच्या लक्षात आले. तरुणाने याबाबत तिला जाब विचारला असता, तिने आपले खरे रूप दाखवले. तिने तरुणाला पैशांचे मोठे आमिष दाखवले आणि त्या बदल्यात सीमाभागातील भारतीय सुरक्षा दलांच्या ठाण्यांचे आणि हालचालींचे फोटो पाठवण्यास सांगितले.

हा ‘हनीट्रॅप’ सौंदर्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न असल्याचे समजताच तरुणाने तात्काळ तो पाकिस्तानी नंबर ब्लॉक केला. मात्र, त्यानंतरही त्याला वेगवेगळ्या पाकिस्तानी नंबरवरून फोन आणि मेसेज येऊ लागले. त्याला कधी पैशांची लालच दाखवण्यात आली, तर कधी गंभीर धमक्या देण्यात आल्या. असे असूनही तरुणाने देशहिताला प्राधान्य दिले आणि आलेल्या सर्व नंबरना ब्लॉक करत राहिला.

सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी

पाकिस्तानवरून येणाऱ्या संशयास्पद व्हॉट्सॲप कॉल्सवर भारतीय सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून होत्या. याच संशयावरून पोलिसांनी तरुणाच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि त्याच्या मोबाईलची तपासणी झाली.

चौकशीत समोर आले की, तरुणाचे कोणतेही चुकीचे मनसुबे नव्हते आणि तो कोणत्याही प्रकारे कट्टरपंथी बनलेला नाही. उलट, त्याने पाकिस्तानी धमक्या आणि आमिषांचा धैर्याने सामना केला होता. तो निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले असून, तो सध्या पोलिसांच्या देखरेखीखाली असेल.

आधीही घडल्या अशा घटना

जम्मूमधील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, स्थानिक तरुणांना जाळ्यात ओढण्याचा ‘आयएसआय’चा हा पहिला प्रयत्न नाही. काही दिवसांपूर्वीच एका २३ वर्षीय तरुणाला स्नॅपचॅट Snapchat वर अशाच प्रकारे एका महिला पाकिस्तानी एजंटने अडकवले होते, ज्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.