श्रीनगर : चिनाब नदीवरील जगातील सर्वाधिक उंच रेल्वे पूल आणि अंजी खड्ड पूल यांसारख्या अभियांत्रिकी कामगिरीमुळे जम्मू-काश्मीरच्या रेल्वे संपर्काला नवी दिशा मिळाली आहे. काश्मीर खोऱ्याला देशाच्या रेल्वे जाळ्याशी जोडणाऱ्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्गामुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच नाशवंत पदार्थ व शेतीमाल देशभरातील बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता सीमावर्ती आणि दुर्गम भागांपर्यंत रेल्वे संपर्क वाढविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे नियोजन असून, गेल्या पाच ते सहा वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे दीड लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली.
श्रीनगर येथील लोकभवनात निवडक माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सिन्हा यांनी रेल्वे, रस्ते, पर्यटन, कृषी, उद्योग आणि जलविद्युत क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. हिमालयातील दुर्गम भौगोलिक परिस्थिती, प्रतिकूल हवामान आणि सुरक्षाविषयक आव्हानांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दळणवळणाची साधने उभारणे आव्हानात्मक ठरले आहे. मात्र, रेल्वे आणि रस्ते संपर्क सुधारल्याने या प्रदेशातील नागरिकांना देशाच्या अन्य भागांशी जोडण्याबरोबरच व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू
काश्मीर खोऱ्याला देशाच्या रेल्वे जाळ्याशी जोडणारा सुमारे २७२ किमीचा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्ग हा या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. चिनाब नदीवरील उंच रेल्वे पूल आणि अंजी खड्ड येथील भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल यांमुळे दुर्गम पर्वतीय भागांतील रेल्वे संपर्क शक्य झाला आहे. या मार्गामुळे प्रवासी वाहतुकीसोबत मालवाहतुकीचे पर्यायही वाढले आहेत. यापुढे सीमावर्ती भागांपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. जम्मू-रियासी ते पुंछ या सुमारे १९० किमीच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाचाही या संदर्भात उल्लेख केला जात आहे. मात्र, नव्याने डीपीआर तयार करण्यात येणाऱ्या मार्गांची अंतिम यादी आणि त्यांची कालमर्यादा स्पष्ट झालेली नाही.
शेतीमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचणे शक्य
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, भूस्खलन किंवा प्रतिकूल हवामानामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. अशा वेळी रेल्वेचा पर्याय उपलब्ध झाल्यास नाशवंत शेतीमाल वेळेत बाजारपेठेत पोहोचविणे शक्य होईल. त्यामुळे वाहतूक खर्च, माल खराब होण्याचा धोका आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यातील अनिश्चितता कमी करण्याची संधी निर्माण होऊ शकते.
पर्यटनातून रोजगारनिर्मितीचा दावा
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या सव्वा कोटीवरून अडीच कोटींपर्यंत वाढल्याचे सिन्हा यांनी सांगितले. सुधारित रेल्वे आणि रस्ते संपर्कासह विमानसेवांमधील वाढीमुळे पर्यटनाला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. अमरनाथ यात्रा, धार्मिक पर्यटन आणि पर्वतीय पर्यटनासाठीही सुधारित दळणवळण उपयुक्त ठरत आहे. काश्मीर खोऱ्यात पाच हजारांहून अधिक नवीन हॉटेल्स आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला. पर्यटन व्यवसायाच्या विस्तारातून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
उद्योग आणि जलविद्युत क्षेत्रावर भर
– २०२१ मध्ये लागू करण्यात आलेल्या औद्योगिक धोरणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळाल्याचे सिन्हा यांनी सांगितले. गुंतवणुकीसाठी प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांपैकी सुमारे ७० टक्के प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला.
– औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा विस्तार यांमुळे स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. जलविद्युत क्षेत्रातही जम्मू-काश्मीरमध्ये मोठी क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले.
– २०१९ पर्यंत या प्रदेशात सुमारे ४,५०० मेगावॅट जलविद्युत निर्मिती होत होती, तर भविष्यात सुमारे १० हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्राचे सकल राज्य देशांतर्गत उत्पादनातील योगदान दुप्पट करण्याचे उद्दिष्टही त्यांनी मांडले.
शांतता, सुरक्षा आणि विकासाचा मुद्दा
– जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेची परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आणि विकासासाठी नागरिकांची इच्छा असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. श्रीनगर आणि जम्मू येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली.
– रेल्वे पूल आणि मार्ग हे विकासाचे दृश्यमान टप्पे असले, तरी त्यांचे व्यापक महत्त्व बाजारपेठांच्या एकत्रीकरणात आहे. काश्मीरमधील उत्पादने मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचणे आणि सिमेंट, अन्नधान्य, खते, दूध तसेच औद्योगिक वस्तूंचा पुरवठा खोऱ्यात अधिक सुलभ होणे, यामुळे या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळू शकते.
